अमेरिकेने ३३ कोटी रुपये किमतीच्या ३०७ प्राचीन मूर्ती भारताला परत केल्या !

सुभाष कपूर या एकाच तस्कराने चोरल्या होत्या २३५ मूर्ती

नवी देहली – अमेरिकेने भारतातून चोरीस गेलेल्या ३०७ प्राचीन मूर्ती भारताला नुकत्याच परत केल्या. या मूर्तींची किंमत ३३ कोटी रुपये एवढी आहे. १७ ऑक्टोबर या दिवशी अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी या प्राचीन मूर्ती भारतीय अधिकार्‍यांकडे सुपुर्द केल्या. यांपैकी २३५ मूर्ती तस्कर सुभाष कपूर याने चोरल्या होत्या. एका अहवालानुसार यांपैकी किमान १० देवतांच्या मूर्तींची तमिळनाडूमधील मंदिरांमधून चोरी झाली होती. (एवढ्या मोठ्या प्रमाणात मूर्ती चोरीला जाणे, हे तेथील सरकारला लज्जास्पद ! – संपादक)
कपूर याला वर्ष २०११ मध्ये इंटरपोलने जर्मनीतून अटक केली होती. तो वर्ष २०१२ पासून तमिळनाडूच्या त्रिची येथील कारावासात बंदिस्त आहे. अमेरिकेतील मॅनहॅटनच्या सरकारी अधिवक्त्यांनी त्याच्यावर लाखो रुपयांच्या मूर्ती चोरल्याचा आणि तस्करी केल्याचा आरोप केला होता. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासातील एका कार्यक्रमात सर्व ३०७ प्राचीन मूर्ती परत करण्यात आल्या आहेत. या वेळी भारताचे राजदूत रणधीर जैस्वाल उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

एवढ्या मूर्तींची चोरी होईपर्यंत भारतातील पुरातत्व विभाग आणि सुरक्षायंत्रणा झोपल्या होत्या का ? भारताच्या प्राचीन मूर्तींच्या संवर्धनासाठी काहीही न करणारा पुरातत्व विभाग विसर्जित करा !