‘ओ.आर्.एस्.’चे जनक डॉ. दिलीप महालनोबिस यांचे निधन

(ओ.आर्.एस्. म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन – पाणी, साखर आणि मीठ यांचे मिश्रण)

कोलकाता (बंगाल) – प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. दिलीप महालनोबिस यांचे येथील एका खासगी रुग्णालयात १७ ऑक्टोबर या दिवशी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते उपचार घेत होते. डॉ. दिलीप महालनोबिस यांनी वर्ष १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळी ओ.आर्.एस्.चा शोध लावला. या युद्धाच्या वेळी कॉलराची साथ आली होती. अशा वेळी लाखो रुग्णांना ओ.आर्.एस्. दिल्यामुळे त्यांचे प्राण वाचले होते. त्या वेळी मृत्यू दर ३० टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आला होता. यामुळे ओ.आर्.एस्.ला जागतिक मान्यता मिळाली. वर्ष २००२ मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबिया अँड कॉरनेल’ने पोलिन पुरस्कार, तर वर्ष २००६ मध्ये थायलंड सरकारने ‘प्रिंस महिडोल अवॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित केले; मात्र भारत सरकारकडून त्यांना कोणताही पुरस्कार देण्यात आला नाही. (भारतात गुणवंतांची कदर केली जात नाही, असे म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक) डॉ. महालनोबिस यांनी कोलकाता येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ’ला त्यांच्याकडील १ कोटी रुपये दान दिले होते.