वाराणसी आश्रमात सेवा करणाऱ्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भाग्यश्री आणेकर (वय ६५ वर्षे) यांना झालेले शारीरिक त्रास आणि त्या वेळी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

श्रीमती भाग्यश्री आणेकर

१. वाराणसी आश्रमात असतांना झालेले शारीरिक त्रास आणि आलेल्या अनुभूती

१ अ. वाराणसी आश्रमात सेवा करतांना ११ वर्षांत प्रथमच थंडीमुळे असह्य शारीरिक त्रास होऊन मुलाची आठवण येणे : ‘मी वाराणसी आश्रमात अन्नपूर्णाकक्षात सेवा करत आहे. मला या वर्षीची (वर्ष २०२१ ची) थंडी सहन झाली नाही. शेवटी मी आजारी पडून अशक्त होत गेले. माझ्या दोन्ही पायांत गोळे येत होते. मला पाय खाली-वर करता येत नव्हते. मला उठणे-बसणेही कठीण होत होते. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना हाक मारताक्षणीच त्याची तीव्रता अधिक झाली. नामजप करत असतांना मस्तकात कळा येऊन मला पुष्कळ घाम येत असे. माझ्या छातीतही कळा येत असत आणि मला श्वास घेणे कठीण होत असे. बरेच दिवस मला असे त्रास होत होते. त्यामुळे मला माझ्या मुलाची आठवण येत होती.

१ आ. पूर्वी प्रतिकूल परिस्थितीत सेवा करून आनंद मिळणे; पण असह्य शारीरिक त्रास होऊ लागल्यावर ‘गुरूंवरील श्रद्धा डळमळत आहे’, असे वाटणे : पूर्वी मी अध्यात्मप्रसाराची सेवा करत होते. तेव्हा केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मी प्रतिकूल परिस्थितीतही सेवा केली. त्या वेळी मला पुष्कळ आनंद मिळत होता; पण त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांवर असणारी माझी श्रद्धा आता मला होणार्या या त्रासामुळे डळमळीत होत होती.

१ इ. झोपेतून लवकर उठता न येणे आणि त्या वेळी श्रीरामाला कळवळून प्रार्थना करणे : त्रासामुळे मला झोपेतून उठायला अर्धा घंटा लागत असे. त्यानंतर वैयक्तिक आवरणे, म्हणजे मला तो कामाचा डोंगरच वाटत असे. स्नान केल्यावर मला बरे वाटत असे. मी श्रीरामाला सतत कळवळून प्रार्थना करत असे, ‘आता माझ्याकडून सेवा होत नाही. तू माझी अशी अवस्था का केलीस ? माझे काय चुकत आहे ? गुरुदेवांना माझी ही अवस्था अजून का कळत नाही ? श्रीरामा, तू त्यांना का सांगत नाहीस ? आई जगदंबे, अन्नपूर्णामाते, तू त्यांना का सांगत नाहीस ?’,

१ ई. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर खोलीत सर्वत्र त्यांची छायाचित्रे सूक्ष्मातून दिसणे आणि ‘श्री गुरु सतत समवेत आहेत’, याची जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त करणे : त्यानंतर माझ्या मनात विचार आला, ‘माझा मृत्यू होणार असेल, तर प्रार्थना करून तरी काय उपयोग ? ज्यांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला वाराणसीला शिवाच्या स्वाधीन केले, तेच माझी काळजी घेणार आहेत. नंतर मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना करत असे, ‘जे काही होणार, ते सर्व ईश्वरेच्छेने होऊ दे. मला बळ द्या.’ तेव्हा मला माझ्या चारही बाजूंना, खोलीत आणि पलंगावरही गुरुदेवांची मोठमोठी छायाचित्रे सूक्ष्मातून दिसायची आणि ‘श्री गुरु माझ्या समवेतच आहेत’, याची जाणीव होऊन मी कृतज्ञता व्यक्त करायचे.

१ उ. अन्नपूर्णामातेला प्रार्थना केल्यावर आलेल्या अनुभूती

१ उ १. अन्नपूर्णामातेला प्रार्थना करतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन होणे : माझ्या पायांत, हाडांत आणि नसांत वेदना चालू झाल्यावर मी झोपून रहात असे. मुखात ज्या देवतेचे नाम येईल, त्या देवतेच्या नामाचा आधार घेऊन मी उठत असे. तेव्हा कधी कधी मला सूक्ष्मातून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दिसत असत. मी वाराणसी आश्रमातील अन्नपूर्णामातेला प्रार्थना करतांना कधी कधी मला रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णामातेचे दर्शन व्हायचे. मी अन्नपूर्णामातेला हाक मारत असतांना अनेक वेळा मला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचेच दर्शन होत असे.

१ उ २. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासारखी शक्ती मिळण्यासाठी देवाला प्रार्थना करणे : माझ्या मनात विचार येत असत, ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पुष्कळ शारीरिक त्रास आहेत, तरीही त्या किती प्रवास करतात ! त्यांची श्री गुरूंवरील श्रद्धा किंचितही ढळत नाही. माझ्या पाठीशी हीच जगदंबा (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ) आहे.’ मी देवाला प्रार्थना केली, ‘देवा, मला तिच्यासारखी शक्ती मिळू दे.’

१ उ ३. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून अन्नपूर्णादेवीच शक्ती देत असल्याचे जाणवणे : प्रार्थना केल्यावर मला आतून पुष्कळ बरे वाटून त्या बळावर मी उठून बसत असे. नंतर मारुतीला नमस्कार करत मी हळूहळू उठत असे. माझी मरणोन्मुख स्थिती होत असे. मी पूर्णपणे शक्तीहीन होत असे. केवळ भगवंतानेच मला वाचवले. ‘आई अन्नपूर्णाच श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून मला शक्ती देऊन या कठीण प्रसंगातून तारून नेत आहे’, असे मला वाटले. त्यानंतर माझे स्वतःचे आवरून होत असे.

१ उ ४. रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णामातेचे दर्शन झाल्यावर आनंद होऊन स्वतःच्या त्रासाचा विसर पडणे : देवाला प्रार्थना करतांना मला रामनाथी आश्रम आणि तेथील अन्नपूर्णामाता यांचे दर्शन होऊन आनंदावस्था प्राप्त होत असे. त्यामुळे नंतर नंतर ‘माझे पाय दुखत आहेत किंवा मला त्रास होत आहे’, हेच मी विसरून जात असे. माझी ही स्थिती एक मास टिकून होती.

१ उ ५. रामनाथी आश्रमात जाण्याविषयी निरोप मिळाल्यावर रामनाथी आश्रम आणि तेथील स्वयंपाकघरातील अन्नपूर्णामाता यांचे दर्शन होण्यामागील कारण समजणे : सौ. श्रेया गुरुराज प्रभु (आताची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी अकस्मात् मला रामनाथी आश्रमात जाण्याविषयी निरोप दिला. तेव्हा ‘मला असह्य त्रास होत असतांना सकाळी उठल्यावर मला रामनाथी आश्रम आणि तेथील स्वयंपाकघरातील अन्नपूर्णामाता यांचे दर्शन का होत होते ?’, हे माझ्या लक्षात आले.

२. वाराणसी येथून रामनाथी आश्रमात येत असतांना अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

२ अ. ‘वाराणसीहून गोव्याला आगगाडीतून प्रवास करतांना समवेत असलेले साहित्य गोव्यात कसे उतरवायचे ?’, अशी काळजी वाटणे : आम्ही (मी आणि साधक श्री. शशांक सिंह) वाराणसी येथून आगागाडीने रामनाथी आश्रमात येत असतांना आमच्याकडे साहित्याची २१ खोकी होती आणि ही सगळी खोकी आगगाडीच्या २ डब्यांत ठेवली होती. ‘हे साहित्य गोवा येथे उतरवण्यास डब्यातील लोकांनी साहाय्य केल्यास बरे होईल’, असे मला वाटत होते; कारण एवढे साहित्य आम्हा दोघांना उतरवणे कठीण होते.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सर्व सोपवल्यावर ‘ते शेजारी बसले आहेत’, असे जाणवून मनातील काळजीचे विचार दूर होणे : नंतर मी सर्व श्री गुरूंवर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर) सोपवले. ‘हे देवाचे साहित्य आहे. देवच डब्यातील लोकांना बुद्धी देईल. त्यामुळे ‘चिंता करायला नको’, असे मला वाटले. माझे आणि श्री. शशांक यांचे तिकीट एकत्रित काढले नसल्याने दोघांच्या जागा वेगवेगळ्या ठिकाणी होत्या; परंतु तिकीट तपासनीस आणि एका व्यक्तीच्या साहाय्याने आम्हाला एकमेकांच्या शेजारी जागा मिळाली. ‘सर्व देवच करतो आणि करवून घेतो. त्यामुळे तोच रात्री सर्व साहित्यावर लक्ष ठेवणार आहे’, असे मला वाटले. ‘श्री गुरु समर्थ आहेत’, अशी दृढ श्रद्धा ठेवून मी प्रार्थना केली. तेव्हा ‘माझ्या शेजारी गुरुदेव बसले आहेत’, असे मला जाणवत होते. त्यामुळे मला भीती आणि चिंता वाटली नाही.

२ इ. डब्यातील लोकांनी साहित्य उतरवण्यास साहाय्य करणे : आगगाडी मडगाव (गोवा) येथे पोचल्यावर देवाच्या कृपेने आमच्या डब्यातील लोकांनी आम्हाला साहित्य खाली उतरवण्यास साहाय्य केले. देवाच्या कृपेमुळेच आम्हाला सर्व साहित्य रामनाथीला घेऊन येता आले. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

३. रामनाथी आश्रमात गेल्यावर आलेली अनुभूती

३ अ. रामनाथी आश्रमात गेल्यावर झोपल्यानंतर ‘स्वतःचे डोके परात्पर गुरु डॉक्टरांच्या मांडीवर आहे’, असे जाणवणे आणि त्या वेळी ‘५ – ६ घंट्यांच्या गाढ निद्रेने कितीतरी वर्षांचा शीण गेला’, असे वाटणे : मी पुष्कळ दमल्यामुळे रामनाथी आश्रमात आल्यावर लगेच झोपले. तेव्हा मला ‘माझे डोके परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मांडीवर आहे’, असे जाणवले. मी केवळ डोळे उघडून पाहिले. माझ्यात कृतज्ञता व्यक्त करायलाही त्राण नव्हते. त्यानंतर मी ५ – ६ घंट्यांनंतर उठले. अशी गाढ निद्रा मी कधीच अनुभवली नव्हती. ‘कितीतरी वर्षांचा शीण गेला’, असे मला वाटले.

४. रामनाथी आश्रमात गेल्यावर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मधुमेह झाल्याचे निदान होणे आणि आधुनिक वैद्यांच्या माध्यमातून श्री गुरु वेळोवेळी काळजी घेत असल्याचे लक्षात येऊन कृतज्ञता वाटणे

आश्रमात आल्यावर आधुनिक वैद्यांनी माझी तपासणी कली. तेव्हा ‘मला मधुमेह झाला असून रक्तातील साखरेचे प्र्रमाण पुष्कळ वाढले आहे’, हे लक्षात आले. त्या वेळी मला वाईट वाटले; मात्र ‘मला त्रास का होत आहे ?’, याचे कारण समजले. ‘गुरुदेवांनी योग्य ठिकाणी आणून माझ्यावर उपचार चालू केले’, यासाठी मला कृतज्ञता वाटली. ‘आश्रमात उपचार करणार्या साधकांच्या माध्यमातून श्री गुरूंनीच माझी वेळोवेळी काळजी घेतली’, यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टर आणि सर्व साधक यांच्याप्रती कृतज्ञ आहे.

‘हे गुरुदेवा, ‘तुम्हीच माझ्याकडून हे सर्व लिहून घेतले’, याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्रीमती भाग्यश्री आणेकर (आताची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६५ वर्षे), वाराणसी आश्रम (७.२.२०२२)

  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.