संभाजीनगर शहरातून ३९ दिवसांत महिलांसह ५८ तरुणी बेपत्ता !

  • निष्‍क्रीय पोलीस यंत्रणा !

  • पोलिसांचे दुर्लक्ष !

प्रतीकात्मक छायाचित्र

संभाजीनगर – शहरातील उस्‍मानपुरा आणि मुकुंदवाडी या परिसरातील घरातून महाविद्यालयांत जाण्‍यासाठी निघालेल्‍या १६ वर्षांच्‍या २ मुली अचानक बेपत्ता झाल्‍या आहेत. फूस लावून त्‍यांना कुणीतरी पळवून नेल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला जात आहे. मुलींच्‍या आई-वडिलांनी पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केल्‍यानंतर अपहरणाचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. गेल्‍या ३९ दिवसांत शहरातील तब्‍बल ५८ महिला आणि तरुणी घराबाहेर गेल्‍यानंतर परतलेल्‍या नाहीत. महिलांसह तरुणींना पळवणार्‍यांचे जाळ तर नाही ना ? अशी शंका नागरिकांतून उपस्‍थित होत आहे.

सप्‍टेंबरमध्‍ये शहरातून एकूण १३४ जण बेपत्ता झाल्‍याची नोंद पोलीस ठाण्‍यात आहे. यामध्‍ये ६२ महिला आणि तरुणी यांचा समावेश आहे. १८ ते २९ वर्षे वयोगटांतील ४३ तरुणी घरातून बाहेर गेल्‍यानंतर त्‍या परत आल्‍या नाहीत, तर २९ तरुण घरातून निघून गेले आहेत.

शहरातील विविध पोलीस ठाण्‍यांतून प्राप्‍त आकडेवारीनुसार चालू मासात १ ते ८ ऑक्‍टोबरपर्यंत २१ जण बेपत्ता झाल्‍याची नोंद आहे. यात १५ महिला आणि तरुणी यांचा समावेश आहे. १८ ते २९ वर्षे वयोगटांतील ११ तरुणी घराबाहेर गेल्‍यानंतर परत आलेल्‍याच नाहीत. त्‍या नेमक्‍या कुठे गेल्‍या ? याचा शोधही अद्याप पोलिसांना लागलेला नाही. पोलीस याकडे कानाडोळा करत आहेत, असे नागरिकांचे मत आहे.

बेपत्ता व्‍यक्‍तींचा शोध घेतला जातो का ?

प्रत्‍येक पोलीस ठाण्‍यात बेपत्ता व्‍यक्‍तीच्‍या संदर्भात तक्रार दिल्‍यानंतर पोलिसांकडून त्‍यांचा शोध घेण्‍याकडे दुर्लक्ष केले जात असल्‍याचे समोर आले आहे. घरचे सधन असतील, आणि पाठपुरावा करणारे असतील, तर अशा प्रकरणांतच पोलीस जातीने लक्ष घालून कार्यवाही करतात. सर्वसामान्‍यांची वेळोवेळी पोलिसांकडून विविध प्रश्‍न विचारूनच अडचण निर्माण केली जाते. मागील सव्‍वा मासात महिलांसह ५८ तरुणी बेपत्ता झाल्‍या आहेत. यांपैकी किती जणींचा शोध लागला, याचीही माहिती पोलिसांकडे नाही. त्‍यामुळे पोलिसांची अन्‍वेषण यंत्रणा सुस्‍त झाली आहे का ?, असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे.

संपादकीय भूमिका

  • संभाजीनगर येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुणी बेपत्ता झाल्‍यानंतर त्‍यांतील एकीचाही शोध पोलिसांना कसा लागत नाही ? या प्रकरणी पालीसच गुन्‍हेगारांना पाठीशी घालत नाहीत ना ? असा विचार कुणाच्‍या मनात आला तर चूक ते काय ?
  • स्‍थानिक लोकप्रतिनिधींनी यामध्‍ये लक्ष घालून महिला आणि तरुणी यांचा शोध घेण्‍यासाठी पोलिसांना समयमर्यादा द्यावी. पोलीस महिलांना शोधण्‍यात कुठे अल्‍प पडतात, हे त्‍यांच्‍या वरिष्‍ठांनी पहावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !