स्पर्शातूनच कळते चांगले आणि वाईट…!

अधिवक्त्या सुनीता खंडाळे-साळसिंगीकर

१. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत दिलेल्या निर्णयाला समाजातील विविध स्तरांतून विरोध होणे

१ अ. ‘शरिराचा शरिराशी प्रत्यक्ष संबंध आला, तरच ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत अत्याचार होईल’, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने देणे आणि घराबाहेर पडणार्‍या स्त्रीला त्यासंदर्भात विविध अनुभव येत असणे : ‘मागील वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने एका प्रकरणात ‘शरिराचा शरिराशी प्रत्यक्ष संबंध आला, तरच ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत अत्याचार होईल’, असा निर्णय दिला होता. या निर्णयाविषयी समाजातील सर्व स्तरांतून चर्चा चालू झाली. कायद्याची अभ्यासक आणि एक महिला म्हणून माझ्याही मनात अनेक गोष्टी येऊन गेल्या. वेळोवेळी उच्च न्यायालय, तसेच सर्वाेच्च न्यायालय जे काही निर्णय देतात, त्या निर्णयांना ‘कायदा’ म्हटले जाते. त्यामुळे अनेक गुन्हेगार भविष्यात या निर्णयाचा अपलाभ घेऊ शकतात. ज्या वेळी कोणत्याही वयाची एखादी महिला घराबाहेर पडते, तेव्हा ती घरात येईपर्यंत तिला कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते, हे केवळ तीच सांगू शकते. विविध ठिकाणी अनावधानाने किंवा जाणीवपूर्वक होणारे स्पर्श, तसेच विविध प्रकारे तिच्याकडे वळणार्‍या नजरा यांचे बरेच अनुभव स्त्रीला येतात. या अनुभवांचा तिच्या मनावर सखोल परिणाम होत असतो.

१ आ. प्रत्येक महिलेला वाईट आणि चांगला स्पर्श यांतील, तसेच नजरेतील भेद लक्षात येत असल्याने नागपूर खंडपिठाचा निर्णय चुकीचा वाटणे : जेव्हा एखादी व्यक्ती स्पर्श करते, तेव्हा प्रामुख्याने दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे स्पर्श करणार्‍याची तो करण्यामागील भावना आणि दुसरी म्हणजे स्पर्श झाल्यावर त्या महिलेला जाणवणार्‍या संवेदना ! ज्या वेळी बालकांविषयी असा स्पर्श होत असतो, त्या वेळी ते आयुष्यभर ही गोष्ट विसरू शकत नाहीत. त्यामुळे ‘पॉक्सो’सारखा विशेष कायदा कार्यवाहीत आणला गेला आहे. एवढेच नाही, तर दिवसेंदिवस त्याला अधिकाधिक कठोर करण्यात आले आहे आणि त्याची सर्व स्तरावर कार्यवाही करण्याचाही प्रयत्न होत आहे. सोप्या भाषेत सांगायचे, तर ‘पॉक्सो’ कायद्यानुसार लैंगिक भावनेने केलेला स्पर्श आणि ज्या स्पर्शामुळे बालकाच्या मनात लज्जा निर्माण होईल, असा स्पर्श हा या कायद्यानुसार गुन्हा आहे. कायद्यामध्ये ‘कपडे असतांना किंवा कपडे नसतांना स्पर्श केला, तरच हा लागू होईल’, असे स्पष्टीकरण कुठेही दिलेले नाही. लैंगिक गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पहाता, सुधारित कायद्यानुसार केवळ लिंगच नाही, तर शरिराचा कुठलाही भाग किंवा अन्य कोणतेही तत्सम वस्तू कुठल्याही मर्यादेपर्यंत घातली, तरी बलात्कार केला, असे समजले जाते. त्यामुळे एक महिला म्हणून या विषयाकडे बघतांना मी हे निश्चितपणे सांगू शकते की, प्रत्येक महिलेला वाईट स्पर्श आणि चांगला स्पर्श यांतील भेद निश्चितच समजतो. तसेच एखादी व्यक्ती आपल्याकडे कुठल्या भावनेने पहात आहे, यातील भेदही कळतो. त्यामुळे नागपूर खंडपिठाच्या निर्णयाकडे कायद्याचा अभ्यास म्हणून मी बघते, तेव्हा तो चुकीचा वाटतो.

२. ‘पॉक्सो’ कायद्याचा अपवापर टाळण्यासाठी न्यायालयाकडून उपलब्ध साक्षी-पुराव्यांच्या आधारे प्रकरणाची पडताळणी होणे 

सर्वाेच्च न्यायालयानेही या निर्णयाला त्वरित स्थगिती देऊन या प्रकरणातील आरोपीला नोटीस बजावली. बर्‍याचदा लहान मुलांचा आधार घेऊन खोटी प्रकरणे प्रविष्ट केल्याचे निर्दशनास येते. पती किंवा पत्नी यांच्यात काही वैवाहिक वाद असेल किंवा शेजार्‍यांच्या विरोधात काही वाद असेल, तर ‘पॉक्सो’ची खोटी तक्रार केल्याचे अनेक वेळा निष्पन्न झाले आहे. ‘कायदा जितका गंभीर स्वरूपाचा असतो, तितकेच सबळ पुरावेही असले पाहिजेत’, असे वेळोवेळी उच्च आणि सर्वाेच्च न्यायालय यांनी सांगितले आहे. त्यामुळेच गंभीर स्वरूपाचे आरोप असले, तरी ते खरे आहेत किंवा नाहीत, यांची पडताळणी न्यायालय उपलब्ध साक्षीपुराव्यांच्या आधारे करत असते.

३. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श म्हणजे काय ?

३ अ. चांगल्या स्पर्शाविषयी स्पष्ट करून सांगणे : एकूणच स्पर्श या विषयात जर सांगायचे झाले, तर ‘चांगला स्पर्श (‘गुड टच’) आणि वाईट स्पर्श (‘बॅड टच’) म्हणजे काय ?’, हे जाणून घेतले पाहिजे, तसेच याविषयी लहान मुलांनाही समजावून सांगितले पाहिजे. शाळेतही ‘गुड टच’ किंवा ‘बॅड टच’ यांविषयी शिकवले जाते. त्याप्रमाणे आपणही आपल्या मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधून त्याविषयी चर्चा केली पाहिजे. त्यांना एखाद्या स्पर्शाविषयी काय वाटते, याविषयी मोकळेपणाने बोलायला शिकवले पाहिजे. चांगला स्पर्श हा नेहमीच प्रेमळ आणि सकारात्मक असतो, जो आपल्या जवळच्या व्यक्तीकडून आपल्याला मिळत असतो. असा स्पर्श आपल्याला जाणीव करून देतो की, आपण त्या व्यक्तीचे किती लाडके आहोत किंवा त्याला आपण किती आवडतो ! म्हणून हा स्पर्श आपल्याला सुख देतो.

३ आ. चांगला स्पर्श आनंददायी असणे : चांगल्या स्पर्शाचे उदाहरण म्हणजे आई बाजारात जातांना आपला हात घट्ट पकडून धरते. आपण एखादी चांगली गोष्ट केली, तर आपल्याला घट्ट मिठी मारते. तेव्हा ते आपल्याला मिळालेले बक्षीस असते. आपले वडील जेव्हा आपल्याला आपण केलेल्या चांगल्या गोष्टींविषयी पाठीवर थाप मारतात, ती एक शाबासकी असते. आजोबांची मिठी ही त्यांच्या प्रेमाची पावती असते. मुळात चांगला स्पर्श आपल्याला सुखावतो, आनंददायी अनुभव देतो. हा स्पर्श आपल्याला सुरक्षित अनुभव देतो. अशा स्पर्शाने आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका वाटत नाही.

वाईट स्पर्श म्हणजे ज्यामुळे आपण घाबरतो. आपल्याला भीती वाटते, आपण अस्वस्थ होतो, आपल्याला किळसवाणे वाटते, कुणी आपल्या शरिराला हात लावल्यास आपल्याला तो स्पर्श नकोसा वाटतो आणि आपली चिडचिड होते.

४. पालकांनी मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श यांविषयी जागरूक करणे आवश्यक !

४ अ. मुलांना मनमोकळेपणाने बोलता यावे, यासाठी त्यांच्याशी सुसंवाद साधा ! : प्रथम आपण आपल्या मुलांच्या मनात या गोष्टींविषयी असलेला संकोच दूर करावा आणि त्यांच्यासमोर मोकळेपणाने चर्चा करून त्यांच्या मनातील भीती अन् लज्जा दूर करावी. त्यांना मनातील विचार मनमोकळेपणाने बोलता यावेत, यासाठी वातावरणनिर्मिती करू शकतो. तसेच या विषयातील काही उपयुक्त असलेली पुस्तके किंवा गोष्टी त्यांना वाचायला देऊ शकतो. त्यामुळे या विषयावर आपली मुले मोकळेपणाने बोलू शकतील. नेहमीच लक्षात असू द्या की, यासंदर्भात आपण योग्य ती भाषा आणि योग्य ते शब्द या माध्यमांतून आपल्या मुलांशी संवाद साधावा. त्यांना प्रारंभीपासूनच त्याची माहिती देण्यास प्रारंभ करावा.

४ आ. मुलांना त्यांचे अवयव आणि स्पर्श यांविषयी माहिती द्यावी ! : चांगला आणि वाईट स्पर्श ही गोष्ट एका दिवसात सांगून संपणारी नाही आणि आपणही तसे करू नये. याविषयीची माहिती आपण वेळोवेळी आणि योग्य त्या वेळी मुलांना देणे आवश्यक आहे. मुलांना त्यांचे अवयव आणि स्पर्श यांविषयी माहिती द्यावी. त्यांना कुठल्या गोष्टीविषयी चांगले वाटते आणि कुठल्या गोष्टी आवडत नाहीत, हे समजावून सांगितले पाहिजे. याविषयी जेव्हा त्यांना ज्ञान होईल, तेव्हा त्यांना चांगला आणि वाईट स्पर्श म्हणजे नेमके काय, याविषयी समजेल.

४ इ. मुलांना स्पर्शाविषयी सांगितल्यास भविष्यात त्यांच्यावरील अत्याचार आणि लैंगिक शोषण यांना आळा बसू शकणे : एखादा स्पर्श त्यांना वाईट जाणवत असेल, तर त्याविषयी बोलण्याचा त्यांना अधिकार आहे, उदा. कुणी बळजोरीने त्यांच्या गालांचे किंवा ओठांचे चुंबन घेत असेल आणि त्यांना ते किळसवाणे वाटत असेल, तर ते त्याला ‘नाही’ म्हणू शकतात. ही गोष्ट त्यांना समोरच्यांना सांगतांना कुठल्याही प्रकारची भीती किंवा दडपण येता कामा नये. या गोष्टींमुळे भविष्यात निश्चितच मुलांवरील अत्याचार आणि लैंगिक शोषण यांना आळा बसण्याची शक्यता आहे; कारण मोठ्या प्रमाणात होणारे लैंगिक शोषण हे मुलांच्या मनातील भीती आणि संकोच यांमुळे होत असते. ज्या वेळी त्यांच्या मनातील संकोच निघून जाईल आणि कुठल्याही प्रकारची भीती रहाणार नाही, तेव्हा ते पुढेही नि:संकोचपणे त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांविषयी बोलू शकतील.’

– अधिवक्त्या सुनीता खंडाळे-साळसिंगीकर, बाल आणि महिला विषयी कायद्याच्या तज्ञ, मुंबई