आतंकवाद न ओळखणार्‍या देशांकडून त्याला बळी पडलेल्यांसंदर्भात गंभीर अन्याय ! – भारत

भारताने पाकच्या विरोधात मांडली कठोर भूमिका !

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची

नवी देहली – स्वत:चे हित जोपासणे आणि उदासीनता बाळगणे यांमुळे जे देश आतंकवादाच्या धोक्यांना ओळखत नाहीत, ते आतंकवादाला बळी पडलेल्या लोकांसंदर्भात ‘गंभीर अन्याय’ करत आहेत, अशी भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ८ ऑक्टोबर या दिवशी एक वक्तव्य जारी करत मांडली आहे. जागतिक समुदायातील सर्व गंभीर आणि कर्तव्यदक्ष सदस्य देशांची आंतरराष्ट्रीय आतंकवादाच्या विशेष करून सीमापार आतंकवादाच्या विरोधात भूमिका असली पाहिजे अन् त्यांनी दायित्वाने यावर कृती करायला हवी, असे वक्तव्य भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केले.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो जरदारी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काश्मीरचे सूत्र उपस्थित करून काश्मीर खोर्‍यात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे आरोप केले होते. या परिषदेला जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अन्नालेना बेरबॉकही उपस्थित होत्या. यावर अरिंदम बागची यांनी या वक्तव्याचे खंडण करत भारताची भूमिका मांडली.

बागची पुढे म्हणाले की…

१. जम्मू-काश्मीर हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आतंकवादी मोहिमांना अनेक दशके झेलत आला आहे. आजही आतंकवादी कारवाया थांबलेल्या नाहीत.

२. भारतातील अन्य राज्यांप्रमाणेच जम्मू-काश्मीरमध्येही विदेशी नागरिक आतंकवादाला बळी पडले आहेत. संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद आणि ‘फायनॅन्शियल ॲक्शन टास्क फोर्स’ या जागतिक संघटना अजूनही २६/११ च्या भयावह आक्रमणांना कारणीभूत असलेल्या पाकपुरस्कृत आतंकवाद्यांचा शोध घेत आहेत.

३. जेव्हा देश आतंकवादाच्या अशा धोक्यांना ओळखत नाहीत, तेव्हा ते शांततेच्या उद्दीष्टपूर्तीला प्रोत्साहन देत नाहीत, तर त्यास निष्प्रभ करत असतात. आतंकवादाला बळी पडणार्‍यांसंदर्भात हा गंभीर अन्याय आहे.

संपादकीय भूमिका

  • भारताने आतंकवादाचे सूत्र जागतिक स्तरावर नेऊन त्याला विशेष लाभ झालेला नाही; कारण कोणतेच राष्ट्र या विषयावर भारताला वास्तविक साहाय्य करण्यास इच्छुक नाही. हे वास्तव स्वीकारून आता भारताने जिहादी आतंकवादाचा पोशिंदा असलेल्या पाकला नेस्तनाबूत करणे, हाच एकमेव पर्याय आहे, हे भारतीय शासनकर्ते लक्षात घेतील का ?