ज्ञानवापीतील शिवलिंगाच्या ‘कार्बन डेटिंग’ चाचणीवरील सुनावणी ११ ऑक्टोबरला !

(कार्बन डेटिंग चाचणी म्हणजे कोणत्याही वस्तूचे आयुर्मान मोजण्यासाठी करण्यात येणारी वैज्ञानिक प्रक्रिया)

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाचे ‘कार्बन डेटिंग’ करण्याच्या मागणीवर जिल्हा न्यायालयाने ११ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. मुसलमान पक्षाने याविषयी त्याची बाजू मांडण्याची विनंती केल्यावर न्यायालयाने हा निर्णय घेतला. दुसरीकडे कार्बन डेटिंगवरून हिंदु पक्षांमध्ये दोन गट पडले आहेत. ५ महिला पक्षकारांपैकी राखी सिंह यांनी कार्बन डेटिंगला विरोध केला आहे. कार्बन डेटिंग चाचणीद्वारे शिवलिंग किती प्राचीन आहे, त्याचे आयुर्मान किती आहे, हे समजू शकणार आहे. त्या आधारे ज्ञानवापीवरील हिंदूंचा दावा अधिक प्रबळ होऊ शकणार आहे.

राखी सिंह यांचे अधिवक्ता मन बहादूर सिंह यांचे म्हणणे आहे, ‘ज्ञानवापीमध्ये जे शिवलिंग सापडले आहे, ते कार्बन डेटिंगमुळे खंडित होईल. आपल्या सनातन हिंदु धर्मात भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. त्यामुळे शिवलिंगाचे कार्बन डेटिंग अजिबात करू नये.’ अन्य ४ महिला पक्षकारांचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे म्हणणे आहे की, ‘कार्बन डेटिंग’प्रमाणेच अन्य वैज्ञानिक चाचण्या उपलब्ध आहेत. त्याद्वारे शिवलिंगाचे आयुर्मान मोजता येऊ शकते, असे आम्ही न्यायालयात म्हटले आहे.