प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेणार्‍या सूत्रसंचालकांनी ‘समाजाला उद्बोधक होईल’, अशी मुलाखत घ्यायला हवी !

‘आपण अनेक वेळा दूरचित्रवाणी वाहिन्यांवर किंवा आकाशवाणीवर प्रथितयश कलाकारांच्या मुलाखती पहातो किंवा ऐकतो. मुलाखत घेणारे सूत्रसंचालक कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांची कलाक्षेत्रातील कारकीर्द, त्यांना साहाय्य करणार्‍या व्यक्ती, त्यांचे गुरु इत्यादींविषयी प्रश्न विचारतात आणि ते कलाकार त्याविषयी माहिती सांगतात. मी अभ्यासाच्या दृष्टीने एका प्रख्यात गायिकेची एका प्रसिद्ध दूरचित्रवाणी वाहिनीवरची मुलाखत पहात होते. तेव्हा माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया पुढे दिली आहे.

ईश्‍वरप्राप्तीसाठी संगीतयोग

१. एका प्रसिद्ध दूरचित्रवाणी वाहिनीच्या सूत्रसंचालकाची दायित्वशून्यता

१ अ. मुलाखत घेणार्‍या सूत्रसंचालकाने कलाकाराला त्यांच्या वैयक्तिक गोष्टींविषयी प्रश्न विचारणे : मुलाखत घेणार्‍या सूत्रसंचालकाने कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न विचारण्यावर अधिक भर दिला. सूत्रसंचालकाने त्या कलाकाराला विचारले, ‘‘तुमचा नातेवाइकांशी अनेक वर्षे अबोला होता, असे ऐकले होते’, हे खरे आहे का ? आणि तसे होते का ? त्यासाठी तुम्ही कोणाला उत्तरदायी (जबाबदार) धरता ? अमुक कलाकारांशी तुमचे का खटकले ? तुमच्या नातेवाइकांशी तुमची स्पर्धा होते, असे का ? ती कशी ?’’ सूत्रसंचालकाने त्या कलाकाराला कलासाधनेच्या अनुषंगाने प्रश्न न विचारता अशा प्रकारे वैयक्तिक आयुष्याविषयी अनावश्यक प्रश्न विचारले.

१ आ. सूत्रसंचालकाने कलाकाराला अयोग्य प्रश्न विचारल्यामुळे त्यांना मानसिक त्रास होऊ शकणे आणि समाजातही त्यांच्याविषयी अयोग्य मतप्रवाह निर्माण केला जाणे : सूत्रसंचालकाने कलाकारांना वैयक्तिक प्रश्न विचारल्यामुळे लोकांच्या मनात त्या कलाकारांविषयी बहिर्मुखतेचे विचार येतील. सूत्रसंचालकाकडून कलाकाराला अनावश्यक आणि विषयाला सोडून काही प्रश्न विचारले जातात. अशा प्रश्नांमुळे विषयांतर होऊन संबंधित कलाकारालाही अवघडल्यासारखे होते. अशा मुलाखती ऐकणार्‍यांना आणि पहाणार्‍यांना त्याचा काही लाभ होत नाही. कलाकाराला अनावश्यक प्रश्न विचारल्याने प्रेक्षक बहिर्मुख होऊन समाजातील व्यक्तींना अयोग्य संदेश जातो. ‘असे सूत्रसंचालक समाजातील व्यक्तींना भरकटवत आहेत’, असेच लक्षात आले.

कु. मयुरी आगावणे

२. मुलाखत घेणार्‍या सूत्रसंचालकाने समाजहिताचे भान ठेवणे आवश्यक असणे

२ अ. सूत्रसंचालकाने कलाकाराला ‘नवोदित कलाकारांना मुलाखतीतून शिकता येईल आणि त्यांना त्याचा लाभ होईल’, असे प्रश्न विचारणे आवश्यक असणे : सूत्रसंचालकाने कलाकाराला ‘कलाकाराच्या सांगण्यातून इतरांना काहीतरी शिकता येईल’, असे प्रश्न विचारल्यास समाजातील व्यक्तींना त्याचा लाभ होईल. खरेतर दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध वाहिन्यांवरील कार्यक्रमांतून समाजातील व्यक्तींना अनेक विषयांवर बोधपर माहिती मिळू शकते. दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांवर प्रेक्षकवर्गाला चांगल्या गोष्टी देण्याचे दायित्व आहे. सूत्रसंचालकाने कलाकाराला ‘गुरूंनी त्यांना कसे घडवले ? कलाकाराचा कलेप्रती भाव कसा आहे ?’, असे प्रबोधनात्मक प्रश्न विचारणे आवश्यक आहे. यातून नवोदित कलाकारांना दिशादर्शनही होईल.

२ आ. बोधपर घेतलेल्या मुलाखतीतून समाजातील व्यक्तींना योग्य दिशा देणारा कार्यक्रम सादर होऊन त्याचा मोलाचा लाभ समाजातील व्यक्तींना होईल ! : सूत्रसंचालकाने कलाकारांच्या बोधप्रद घेतलेल्या मुलाखतीतून कलाकारांची उदयोन्मुख पिढी घडणार आहे. समाजातील एक महत्त्वाचा घटक या नात्याने या दूरचित्रवाणी वाहिन्यांकडे नवीन कलाकारांना घडवण्याचे दायित्व आहे. प्रसिद्ध कलाकारांच्या मुलाखतीतून नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळून त्यांना अनेक गोष्टी शिकता येतील. कलेला ‘उपजीविका किंवा मनोरंजन’ यांचे साधन समजणार्‍या समाजातील व्यक्तींना अशा मुलाखतींमुळे कलेचे महत्त्व लक्षात येईल. सूत्रसंचालकाने कलाकारांच्या अभ्यासपूर्ण आणि कलासाधनेच्या दृष्टीने मुलाखत घेतल्यास त्यांच्याकडून समाजोन्नती करण्याच्या कार्यात मोलाचा वाटा उचलला जाईल.’

– कु. मयुरी आगावणे, संगीत अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२७.१.२०२२)