अमेरिकेत ४ भारतियांची हत्या

प्रतीकात्मक छायाचित्र

कॅलिफोर्निया (अमेरिका) – येथून ३ दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या ४ भारतियांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांना गोळ्या झाडून ठार करण्यात आले आहे. कॅलिफोर्नियाच्या मर्सिड काउंटीमधून या चौघांचे अपहरण अपहरण करण्यात आले होते. जसदीप सिंग (वय ३६ वर्षे), जसलीन कौर (वय २७ वर्षे) त्यांची ८ मासांची मुलगी आरोही ढेरी आणि अमनदीप सिंग (वय ३९ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. ठार करण्यात आलेले सर्व जण पंजाबच्या होशियापूर जिल्ह्यातील तांडा येथील हरसी गावातील रहिवासी होते. या हत्यांच्या प्रकरणी पोलिसांनी एका ४८ वर्षीय संशयित मॅन्युएल सालगाडो याला अटक केली होती. पोलिसांनी सांगितले की, सशस्त्र अपहरणकर्त्यांनी एका व्यावसायिक केंद्रातून या चौघांचे अपहरण केले होते. त्यानंतर पोलिसांनी अन्वेषण चालू केले होते.

पोलिसांनी सांगितले की, मॅन्युएल सालगाडो हा पूर्वी मयत अमनदीप सिंग यांच्या कार्यालयात कामाला होता. अपहरण प्रकरणात तो यापूर्वीही शिक्षा भोगत आहे; मात्र त्याने आताचे कृत्य का केले, हे समजू शकलेले नाही. पंजाबी कुटुंबियांनी त्याला नोकरीवरून काढून टाकले असावे किंवा या वैमनस्यातून त्याने ही घटना घडवली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.