रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्री प्रत्यंगिरादेवीचा यज्ञ होण्यापूर्वी आणि तो चालू झाल्यावर साधिकेला झालेले त्रास अन् यज्ञसमाप्तीनंतर अनुभवलेली यज्ञाची परिणामकारकता !

श्री प्रत्यंगिरादेवीचे छायाचित्र

१. यज्ञ चालू होण्यापूर्वी – ‘साधिकेला स्वतःचा आध्यात्मिक स्तरावरील त्रास वाढला आहे’, असे जाणवणे

‘७.२.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्री प्रत्यंगिरादेवीचा यज्ञ होता. त्या वेळी माझा आध्यात्मिक स्तरावरील त्रास वाढला होता. ‘मला त्रास देण्यासाठी वाईट शक्तींचे सूक्ष्मातून षड्यंत्र चालू होते’, असे मला जाणवत होते.

२. यज्ञ चालू झाल्यावर – साधिकेच्या आध्यात्मिक त्रासांत वाढ होणे आणि यज्ञस्थळी बसल्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन तिचा त्रास हळूहळू न्यून होणे

यज्ञ चालू झाला. तेव्हा मी प्रत्यक्षात यज्ञाला उपस्थित नव्हते, तरीही यज्ञाच्या परिणामामुळे माझ्या त्रासांत आणखी वाढ झाली. माझे वागणे आणि बोलणे यांत आक्रमकता आली. माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येऊ लागले. यज्ञामुळे वातावरणात देवीच्या मारक शक्तीचे प्रक्षेपण होत होते. त्यामुळे ‘त्रास होत आहे’, असे मला जाणवले. नंतर मी उपायांसाठी यज्ञस्थळी गेले. तेथे बसल्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन माझा त्रास हळूहळू न्यून झाला आणि मला शांत वाटू लागले.

३. यज्ञ समाप्तीनंतर

३ अ. यज्ञामुळे श्री प्रत्यंगिरादेवीचे मारक तत्त्व वाढून ते कार्यरत झाल्याने श्री भवानीदेवीच्या मूर्तीतील मारक तत्त्वही जागृत होऊन तिच्या डोळ्यांतील बुब्बुळांचा रंग लालसर होणे : यज्ञ समाप्तीनंतर मी यज्ञकुंडाच्या समोर असलेल्या श्री भवानीदेवीच्या मूर्तीला नमस्कार केला. देवीच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर ‘तिच्या बुब्बुळांचा रंग लालसर झाला आहे’, असे मला दिसले. यज्ञामुळे श्री प्रत्यंगिरादेवीचे मारक तत्त्व वाढून ते कार्यरत झाले होते. त्यामुळे वातावरणात आणि श्री भवानीदेवीच्या मूर्तीमध्येही मारकतत्त्व जागृत झाले. त्यामुळे ‘देवीच्या डोळ्यांतील बुब्बुळांचा रंग लालसर झाला’, असे मला जाणवले. ‘या यज्ञामुळे श्री प्रत्यंगिरादेवीचे तत्त्व खरोखरीच जागृत झाले असून ते कार्यरत आहे’, याची मला प्रचीती आली.

३ आ. साधिकेचा त्रास न्यून होणे : यज्ञ झाल्यावर ‘मला होणारा वाईट शक्तींचा त्रास न्यून झाला आहे’, असे मला जाणवले. त्याचा परिणाम मला माझ्या डोळ्यांवर जाणवला. माझ्या डोळ्यांना होत असलेला त्रास न्यून झाला.

३ इ. मनाच्या स्थितीत सकारात्मक पालट झाल्याने यज्ञाच्या परिणामकारकतेची जाणीव होणे : यज्ञामुळे वाईट शक्तीचा त्रास न्यून झाल्याने मला दुसर्‍या दिवशीही त्याचा परिणाम अनुभवता आला. माझी मनाची स्थिती एकदम पालटली. यज्ञाच्या आदल्या दिवशी माझे मन नकारात्मक स्थितीत होते. यज्ञाच्या दिवशी यज्ञामुळे झालेल्या उपायांमुळे माझे मन सकारात्मक झाले. यातून एका यज्ञामुळे व्यक्तीला होणारा वाईट शक्तींचा त्रास कितीतरी पटींनी न्यून होतो.

४. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने यज्ञाला बसण्याची संधी मिळाल्याने ‘यज्ञयागांचे महत्त्व आणि त्यांचा समष्टी स्तरावर होणारा लाभ’ अनुभवता येऊन कृतज्ञता वाटणे

‘पदोपदी देवच विविध माध्यमांतून रक्षण करत असतो’, याची आम्हा सर्वसामान्य जिवांना जाणीवही नसते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला यज्ञाला बसण्याची संधी मिळाली आणि त्यातून ‘यज्ञयागांचे महत्त्व आणि समष्टी स्तरावर त्यांचा होणारा लाभ’ मला अनुभवता आला. ‘देवता सर्व प्राणीमात्रांवर कृपा करून राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात, तसेच वैयक्तिक जीवनात येणारे अडथळे दूर करतात. साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर करून त्यांचे जीवन सुसह्य करतात’, याची मला जाणीव झाली. याबद्दल ऋषिमुनी, सर्व देवता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करते.’

– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०२०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक