उत्तर कोरियाने जपानवर डागले क्षेपणास्त्र !

टोकियो (जपान) – उत्तर कोरियाने ४ ऑक्टोबर या दिवशी जपानवर क्षेपणास्त्र डागले. यामुळे जपानच्या काही भागांतील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. जपान सरकारने या आक्रमणावरून जपानच्या उत्तरेकडील होक्कइडो बेट आणि ईशान्येकडील आओमोरी प्रांतातील नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देत इमारतीतच रहाण्याचे अथवा भूमीगत होण्याचे आवाहन केले. जपानच्या क्षेत्रात असलेल्या प्रशांत महासागरात ४ ऑक्टोबरच्या सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी हे क्षेपणास्त्र पडले.

‘बीबीसी’ वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या क्षेपणास्त्राने ४ सहस्र ५०० किमी अंतर आणि १० सहस्र किमी उंची गाठली होती. प्रशांत महासागरात ज्या ठिकाणी क्षेपणास्त्र पडले, तेथून अमेरिकी बेट गुआम जवळ आहे. ‘मागील आठवड्यात अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांनी संयुक्त सैनिकी अभ्यास केला होता. त्याला विरोध दर्शवण्यासाठीच उत्तर कोरियाने हे क्षेपणास्त्र डागले’, असे म्हटले जात आहे. याआधीही वर्ष २०१७ मध्ये उत्तर कोरियाने अशा प्रकारे क्षेपणास्त्र डागले होते.