वर्ष २०२० मध्ये झालेल्या नवरात्रीच्या काळातील विशेष भावसत्संगांमध्ये उत्तरप्रदेशातील साधिकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

सनातननिर्मित दुर्गादेवीचे सात्विक चित्र

१. कु. टुपुर भट्टाचार्यजी, देहली

१ अ. भावसत्संगात ‘देवीला अनुभवण्याचा प्रयत्न करा’, असे सांगितल्यावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन होणे आणि सत्संगातील प्रत्येक शब्द मनाला स्पर्शून जाणे : ‘नवरात्रीच्या दिवसांतील भावसत्संग पुष्कळ आनंददायी होते. भावसत्संगात ‘देवीला अनुभवण्याचा प्रयत्न करा’, असे सांगितले जायचे. ‘तेव्हा मला अधिकतर वेळा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दिसत होत्या. आठव्या दिवशी श्री मुकांबिकादेवीविषयी सांगितले की, आपल्या मनातील सगळा अंधकार दूर होत आहे. तेव्हा मला रडू आले आणि ‘माझ्या मनातील अंधकार दूर होत आहे’, असे मला वाटले. भावसत्संगातील प्रत्येक शब्द माझ्या मनाला स्पर्शून जात होता. ‘काही दिवसांनंतर पुनः नवरात्री यायला पाहिजेत’, असे वाटत होते.’

२. आशा आनंद, देहली

२ अ. भावसत्संग ऐकून भावविभोर होणे आणि चंद्रघंटादेवीचा सत्संग ऐकून झोपल्यावर ‘देवघरातून उठून देवी स्वतःजवळ आली आहे’, अशी अनुभूती येऊन आनंद मिळणे : ‘नवरात्रीच्या काळात रात्री ९ वाजता भावसत्संग ऐकून मी भावविभोर होऊन जात होते. मी आमच्या देवघरातील देवीची मूर्ती सजवून ठेवायचे. १९.१०.२०२० या दिवशी चंद्रघंटादेवी विषयीचा सत्संग ऐकून मी झोपले आणि झोपेत देवीशी बोलू लागले. तेव्हा ‘देवी देवघरातून उठून माझ्याजवळ आली आहे’, असे मला वाटले. त्यानंतर मी देवघरात गेले आणि बराच वेळ तेथे बसून या अनुभूतीचा पुष्कळ आनंद घेतला.’

३. बबिता सिंह, आग्रा

३ अ. दुर्गादेवीचा सत्संग ऐकल्यावर देवीचे अस्तित्व जाणवणे : ‘दुर्गादेवीचा सत्संग ऐकला. तेव्हा ‘जणू देवी माझ्यासमोर उभी आहे’, असे मला वाटले. माझ्या अंगावर रोमांच येऊन डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. माझ्या कन्या कु. अरिप्रा राज आणि कु. अनुभूती यांनाही ‘देवीने मनमंदिरात दर्शन दिले’, असे वाटले.’

४. सौ. स्वप्नजा तळेगावकर, गुरुग्राम

४ अ. सत्संगात चंद्रघंटादेवीविषयी ऐकत असतांना ‘स्वतःची सुप्तावस्थेतील चक्रे जागृत होत असून दैवी शक्तीचा संचार होत आहे’, असे जाणवणे : ‘मला नवरात्रीमधील देवीचे सत्संग पुष्कळ आवडले. मी चंद्रघंटादेवीविषयी ऐकत होते. तेव्हा ‘माझी सुप्तावस्थेतील चक्रे जागृत होत आहेत. घंटानादाने माझ्या शरिरातील सर्व स्वभावदोष आणि अहंकार नष्ट होऊन बाहेर जात आहेत अन् शरिरात एका अद्भुत शक्तीचा संचार होत आहे’, असे वाटून मला दैवी शक्तीची जाणीव झाली.’

५. सौ. मंजुळा कपूर, देहली

५ अ. प्रतिदिन तिन्ही गुरूंचे ज्योती स्वरूपात दर्शन होणे : ‘मला परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या तिन्ही महागुरूंचे प्रतिदिन ज्योती स्वरूपात दर्शन झाले.

५ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सरस्वतीदेवीच्या रूपात दर्शन होणे आणि देवीचे वीणावादन ऐकतांना सर्व साधक स्वतःला हरवून जाणे : ‘हे शारदा मा’, या भजनाला आरंभ होताच मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सरस्वतीदेवीच्या रूपात दर्शन झाले. ‘मी बालसाधिका होऊन नृत्यातून सरस्वतीदेवीची आराधना करत आहे. देवीचे मंद हास्य माझ्या मनाला आनंद देत असून आम्ही सर्व जण देवीचे वीणावादन ऐकण्यात स्वतःला हरवून गेलो आहे’, असे मला जाणवले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने नवरात्रीच्या सत्संगांतून पुष्कळ चैतन्य आणि शक्ती प्राप्त झाली. जणू ‘आपत्काळापूर्वी परात्पर गुरु डॉक्टर आम्हा सर्व साधकांना संरक्षणकवच प्रदान करत आहेत’, असे मला वाटले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २२.११.२०२०)