माता सरस्वती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ !

सध्या नवरात्र उत्सव चालू आहे. शक्तीची आणि विद्येची देवता म्हणून माता शारदादेवीचा हा उत्सव ‘शारदा उत्सव’ म्हणूनही साजरा केला जातो. शारदादेवीला ‘सरस्वतीमाता’ असेसुद्धा संबोधले जाते.

श्री. दुर्गेश परुळकर

वन्दे सरस्वतीं देवीं मयुरासनमण्डिताम् ।
वीणावादननादेन रमयन्ति जगत् त्रयम् ॥

अर्थ : मयूरासनावर विराजमान झालेल्या आणि वीणावादनाच्या नादाने तिन्ही लोकांना आनंद देणार्याम सरस्वतीदेवीला मी वंदन करतो.
अशा उत्कट भावनेने सरस्वतीमातेचे गुणगान गाऊन तिला वंदन केले आहे. अशा मातेचा अवमान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी केला आहे. ते आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘सरस्वतीला आम्ही पाहिले नाही. सरस्वतीने केवळ ३ टक्के लोकांना ज्ञान दिले. तिचा फोटो (चित्र) शाळेत का लावायचा ? सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे देव आहेत. त्यांचे फोटो शाळेत लावले पाहिजेत.’’

१. छगन भुजबळ यांच्या विधानातून ‘बुद्धी कशी भ्रष्ट होते ?’, ते स्पष्ट होणे

छगन भुजबळ यांनी सरस्वतीमातेविषयी जे उद्गार काढले, त्याविषयीच आक्षेप आहे. ‘सरस्वतीदेवीला पाहिले नाही, मग तिचा फोटो का लावायचा ?’, असा प्रश्न उपस्थित करणार्याव छगन भुजबळ यांना एक सामान्य प्रश्न विचारायचा आहे. हा प्रश्न विचारण्यामागचा हेतू असा की, त्यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या विधानाचा अर्थ ‘ज्यांना आपण पाहिले नाही, त्यांचे चित्र लावायची आवश्यकता नाही’, असा होतो. त्याला अनुसरून प्रश्न आहे. सावित्रीबाई फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या आणि अशा कोणत्याही जातीत जन्माला आलेल्या महनीय व्यक्तींविषयी आम्हाला नितांत आदर आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. भेदभाव करून विधान करतांना बुद्धी कशी भ्रष्ट होते, ते सांगण्याचा आमचा हेतू आहे.

२. छगन भुजबळ यांच्या विधानांमधून परस्परविरोधी, वैचारिक आणि बौद्धिक गोंधळ दिसणे

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ या दिवशी झाला. सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला तो दिवस १० मार्च १८९७. छगन भुजबळ यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९४७ या दिवशी झाला, म्हणजे सावित्रीबाई यांचे निधन झाल्यानंतर ५० वर्षांनी त्यांचा जन्म झाला आहे. त्यावरून आपण असे निश्चित अनुमान काढू शकतो की, भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले यांना प्रत्यक्ष पाहिले नाही. किंबहुना वर्ष १८९७ नंतर जन्माला आलेल्या कोणत्याही व्यक्तीने सावित्रीबाई फुले यांना पहाणे शक्य नाही. तरीसुद्धा ‘सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्र शाळेत लावले, तरी चालते’, असे ते म्हणतात. त्यांनी जसे सरस्वतीदेवीला पाहिलेले नाही, तसे त्यांनी सावित्रीबाई फुले यांनाही पाहिलेले नाही; पण त्यांचे छायाचित्र शाळेत लावला तर चालणार आहे. खरेतर छगन भुजबळ यांची दोन्हीही विधाने परस्परविरोधी आहेत, तसेच यातून त्यांचा वैचारिक आणि बौद्धिक गोंधळ झाला असल्याचे सिद्ध ते करतात.

३. भुजबळ यांनी जातीजातींमध्ये वैमनस्य निर्माण करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणे

श्री सरस्वतीदेवीची उपासना केल्यावाचून कुणीही महान होत नाही. आपल्या संस्कृतीने सदाचरणी, सद्गुणी, ज्ञानी लोकांना, समाज आणि राष्ट्र कार्य निरपेक्ष भावनेने करणार्यान महनीय व्यक्तींना देवस्थानी अन् पूज्यस्थानी मानले आहे. त्या व्यक्तींमध्ये सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा समावेश होतो. असे असले, तरी छगन भुजबळ यांच्या मनात ब्राह्मण समाजाविषयी द्वेष आहे, हे लपून राहिलेले नाही. तो ते वेळोवेळी व्यक्त करतातच; पण त्यांनी तो राग सरस्वतीदेवीवर काढू नये आणि तिचा अपमान करू नये. छगन भुजबळ यांनी एवढा सारासार विवेक दाखवला असता, तर त्यांची सद्सद्विवेकबुद्धी अल्प प्रमाणात का होईना जागी आहे, असे म्हणता आले असते.

वास्तविक आपल्या राज्यघटनेने सर्वधर्म समभाव स्वीकारला आहे. जेव्हा सर्वधर्म समान असतात, तेव्हा सर्व जातीसुद्धा समान असतात, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मग छगन भुजबळ हे जातीजातींमध्ये वैमनस्य निर्माण करून देशातील सामाजिक वातावरण आणि सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत का ? अशी शंका येते.

४. सरस्वतीदेवीविषयी कोणताही आदरभाव नसल्यानेच भुजबळ यांच्या वाणीतून अर्वाच्य उद्गार निघणे

भुजबळ यांनी स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेवून ‘सरस्वतीमातेबरोबर ज्या ज्या व्यक्तींनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे, समाजाला सुशिक्षित आणि सुसंस्कृत करण्यासाठी ज्यांनी स्वतःचे आयुष्य निरपेक्ष भावनेने समर्पित केले, त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव जतन करावा’, असे म्हटले असते, तर त्यांची प्रतिमा अधिक उजळली असती. त्यांनी राजकीय पक्षाचा एक नेता म्हणून आपण कसे योग्य आहोत, तेही सिद्ध केले असते; पण सरस्वतीमातेची कृपादृष्टी त्यांना लाभली नाही; कारण ते देवीचे अस्तित्वच नाकारत आहेत. तिच्याविषयी त्यांच्या मनात कोणताही आदरभाव नाही; म्हणून त्यांच्या वाणीतून अर्वाच्य उद्गार निघाले. याची अनुभूती सरस्वतीमातेवर नितांत श्रद्धा आणि निष्ठा असलेल्या तिच्या भक्तांना झाली. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.