१. लंपी चर्मरोगामुळे देशातील २० राज्यांतील पशूधन बाधित होऊन दूध उत्पादनावर परिणाम होणे
वर्ष २०१९ मध्ये लंपी त्वचारोगाचा प्रसार भारत, बांगलादेश आणि चीन या देशांमध्ये झाला. तेव्हापासून भारतातील २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमध्ये हा रोग पसरला आहे. राजस्थान आणि गुजरात या राज्यांसमवेतच आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, मणीपूर, ओडिशा, तमिळनाडू, तेलंगाणा, उत्तरप्रदेश आणि बंगाल या राज्यांतील १७५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये या रोगाचा संसर्ग दिसून आला आहे. या आजाराचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने पशूपालक चिंताग्रस्त झाले आहेत. या रोगामुळे १५ लाखांहून अधिक जनावरांना बाधा झाली आहे आणि ७० सहस्रांहून अधिक पशूधनाचा मृत्यू झाला आहे. संबंधित राज्य सरकारे हा आजार आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. एका राज्यातून दुसर्या राज्यांमध्ये याचा प्रसार वाढत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, राजस्थानच्या ३३ हून अधिक जिल्ह्यांमध्ये, तर गुजरातच्या ३३ पैकी २६ जिल्ह्यांमध्ये हा रोग पसरत आहे. पंजाब, उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्यांतील बहुतांश जिल्ह्यांमध्ये याचा प्रसार झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात घट होत आहे. ही घट राजस्थानमध्ये ३० टक्क्यांहून अधिक, गुजरातमध्ये १० टक्के आणि पंजाबमध्ये ७ टक्के दिसून आली आहे. काही भागांमध्ये दूध उत्पादनात
१०० टक्के घट दिसून येत आहे. दूध उत्पादनामध्ये घट होत असल्यामुळे विविध दूध संकलन संघांनी दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ केली आहे. ज्या शेतकर्यांचे दैनंदिन जीवन पशूपालनावर अवलंबून आहे, त्यांची मोठी आर्थिक हानी होऊन त्यांचे जीवनमान उद्ध्वस्त होत आहे.
२. पशूधनाची हानी टाळण्यासाठी शासनाने लसीकरण मोहिमा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे आवश्यक !
पावसाळ्यामुळे या रोगाचा धोका अधिक तीव्र होत आहे. माशा, डास, चिलटे आणि गोचीड यांमुळे या रोगाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व राज्यांमध्ये गाय आणि म्हैस यांच्या लसीकरणाचे अभियान चालू करण्यात आले आहे. या रोगामध्ये मरतुकीचा (अशक्तपणाचा) दर अत्यल्प दिसून येत असला, तरी मोठी आर्थिक हानी टाळण्यासाठी प्रभावी लसीकरण मोहीम राबवून या रोगाचा संसर्ग अल्प करता येतो. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चिंनवाल या गावात प्रारंभी ४ ऑगस्ट या दिवशी संसर्गजन्य जनावर आढळले. सध्या महाराष्ट्रातील १७ हून अधिक जिल्ह्यांमध्ये हा रोग पसरला आहे. त्यामुळे पशूधनाचे खरेदी-विक्री बाजार, बैलांच्या शर्यती, गुरांच्या यात्रा, पशूधनाचे प्रदर्शन यांवर बंदी घालण्यात आली आहे.
३. संकरित गायींमध्ये या रोगाचा प्रसार आणि मृत्यूदर अधिक प्रमाणात दिसून येणे
या रोगाची बाधा केवळ गाय आणि म्हैस या पशूधनामध्ये दिसून येते. डास, माशा, चिलटे आणि गोचीड यांमुळे या रोगाचा प्रसार होतो, तसेच संसर्गजन्य पशूधनाच्या संपर्कामुळे अन् त्यांच्या संगोपनातील भांडी आणि इतर वस्तू यांच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो. संकरित गायींमध्ये या रोगाचा प्रसार आणि मृत्यूदर अधिक प्रमाणात दिसून येतो. गाय आणि म्हैस या व्यतिरिक्त इतर प्राण्यांमध्ये या रोगाचा संसर्ग आढळून येत नाही. संसर्गजन्य पशूधनाचे मांस, दूध आणि इतर उत्पादने सेवन केल्यामुळे या रोगाचा प्रसार होत नाही.
४. लंपी चर्मरोगाची लक्षणे
अ. मोठ्या प्रमाणात ताप येणे (४१ डिग्री सेल्सिअस किंवा १०६ डिग्री फॅरेनहाईट )
आ. नाक, तोंड आणि डोळे यांमधून स्राव वहात रहाणे
इ. त्वचेवर उंचवटा असलेल्या गाठी येणे
ई. विषाणूंचा संसर्ग झाल्यापासून ४ ते १४ दिवसांनी या रोगाची लक्षणे दिसू लागतात.
उ. या रोगात त्वचा आणि कास यांवर गाठी दिसून येतात. या गाठी गोलाकार कठीण आणि वेदनादायक असतात. तसेच अन्न, श्वसन आणि जनन मार्ग यांच्या आतील आवरणामध्ये दिसून येतात.
ऊ. या गाठींमध्ये पातळ पाण्यासारखा आणि करड्या रंगाचा पू सदृश्य स्राव दिसून येतो. तो काही वेळा वहात रहातो.
ए. गळा, पाय आणि कास यांच्यावर सूज येते. शरिराच्या बाधित भागांमध्ये खाज सुटते.
५. रोगावरील उपचारपद्धती
अ. त्वचा आणि कास यांच्यावरील फोड स्वच्छ करून ते कोरडे करणे अन् त्यावर प्रतिजैविकांचे मलम लावणे.
आ. कास आणि स्तन बाधित झाल्यास ते कोरडे करून त्यावर प्रतिजैविकांचे मलम लावावे.
इ. संपूर्ण विश्रांती आणि सकस आहार द्यावा.
ई. सल्फोनिमाईड, इतर प्रतिजैविके आणि वेदनाशामक औषधे पशूवैद्यकाच्या सल्ल्याने देण्यात यावीत.
उ. संसर्गजन्य भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवणे महत्त्वाचे आहे.
६. सतरा लाखांहून अधिक पशूधनाचे लसीकरण करण्यात येणे
‘भारतीय कृषी संशोधन संस्था’ देशी बनावटीची लस सिद्ध करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. ही लस अधिक प्रभावी होण्यासाठी इतर संशोधन संस्थांचे साहाय्य घेऊन संस्था कार्य करत आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या लसीचा वापर ६ मासांवरील गाय-म्हैस या प्रवर्गातील पशूधनाचे या रोगापासून संरक्षण करण्यास सक्षम आहे. क्षेत्रीय पशूसंवर्धन केंद्राद्वारे या रोगाचे प्रतिबंधासाठी लसीकरण अभियान राबवण्यात येत आहे. आजपर्यंत १७ लाखांहून अधिक पशूधनाचे लसीकरण करण्यात आले आहे.
७. लंपी चर्मरोग आटोक्यात आणण्यासाठी आयुर्वेदाचे उपचार
७ अ. प्रतिबंधात्मक उपाय (खाण्यासाठी)
७ अ १. साहित्य : खायची पाने १० नग, काळे मिरे १० ग्रॅम, मीठ १० ग्रॅम, गूळ १०० ग्रॅम.
७ अ २. मिश्रण सिद्ध करण्याची पद्धत : प्रथम काळे मिरे ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर ते काळे मिरे, मीठ आणि खायची पाने यांची चटणी करावी. या मिश्रणामध्ये गूळ चांगला एकजीव करावा. त्यानंतर या एकजीव मिश्रणाचे छोटे लाडू करून घ्यावे. नंतर बाधित पशूधनास ३ ते ५ दिवस किंवा बरे वाटेपर्यंत या मिश्रणाचा एक लाडू दिवसातून ३ वेळेला खाऊ घालावा.
७ आ. औषधोपचारासाठी (खाऊ घालणे)
७ आ १. साहित्य : लसूण २ पाकळ्या, धने १० ग्रॅम, काळे मिरे १० ग्रॅम, खायची पाने १० नग, हळद पूड १० ग्रॅम, कांदे २ नग, तुळशीची पाने १ मूठ, कडुनिंबाची पान १ मूठ, बेलाची पाने १ मूठ, गूळ, शिराटा पुड २० ग्रॅम, तमालपत्रे १ मूठ.
७ आ २. औषध बनवण्याची पद्धत : प्रथम धने, जिरे आणि काळी मिरी एकत्र करून पाण्यामध्ये ३० मिनिटे भिजत ठेवावे. नंतर वरील सामुग्री कुटून चटणी करावी आणि शेवटी उर्वरित साहित्य निर्धारित केलेल्या प्रमाणानुसार या चटणीत घालून चांगले खलून घ्यावे. या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू बनवावेत. संसर्गजन्य पशूधनास ३ ते ५ दिवसांपर्यंत किंवा बरे वाटेपर्यंत दिवसातून ३ वेळेला एकेक लाडू द्यावा.
७ इ. त्वचेवरील जखमेला लावण्यासाठी
७ इ १. साहित्य : तुळशीची पाने १ मूठ, हळदपूड २० ग्रॅम, कडुनिंबाची पाने १ मूठ, मेहंदी पाने १ मूठ, लसूण १० पाकळ्या, खोबरेल तेल ५०० मि.ली.
७ इ २. औषध सिद्ध करून वापरायची पद्धत : प्रथम कढईमध्ये खोबरेल तेल घ्यावे. त्यात तुळस, मेहंदी आणि कडुलिंब यांची पाने अन् लसूण घालून त्याचा एकजीव होईपर्यंत चांगला अर्क सिद्ध करावा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचा स्वच्छ कापडाने जखमांवर लेप द्यावा. नंतर हळदपूड जखमांवर लावावी. अशा प्रकारे दिवसातून दोन वेळा, म्हणजे सकाळ-संध्याकाळ जखमांवर उपचार करावा.
वरीलप्रमाणे प्रतिदिन ताजी सामुग्री वापरून औषध सिद्ध करून वापरावे.
८. रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी घ्यावयाची काळजी
अ. गोठा आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा.
आ. शेण, लघवी आणि सांडपाणी यांचा योग्य निचरा होईल, अशी उपाययोजना करावी. असे केल्यास डास, माशा, चिलटे आणि गोचीड या रोगवाहक कीटकांच्या वाढीला आवश्यक पोषक वातावरण नाहीसे होईल.
इ. नवीन गाय किंवा म्हैस विकत आणल्यास तिला ५ आठवड्यापर्यंत मुख्य कळपात ठेवू नये.
ई. संसर्गजन्य पशूधनाला वेगळे करून त्यांची विशेष काळजी घ्यावी.
उ. अशा पशूधनाची हाताळणी केल्यानंतर संबंधित शेतकरी आणि पशूवैद्यक यांनी त्यांचे हात साबणाच्या पाण्याने किंवा योग्य त्या ‘सॅनिटायझर’ द्रावणाने स्वच्छ धुवावेत, तसेच त्यांनी अशा वेळी वापरलेले कपडे आणि साहित्य निर्जंतुक करून घ्यावे.
ऊ. रोगग्रस्त पशूधन दगावल्यास त्याचे मृत शरीर ८ फूट खोल खड्ड्यात पुरावे.
वर दिलेल्या घरगुती उपायांखेरीज जवळच्या पशूवैद्याचे मार्गदर्शन घेऊन योग्य ते उपचार करावेत.
९. ही खबरदारी घ्या !
अ. संसर्गजन्य पशूधनाचा शेष राहिलेला चारा, वापरलेली भांडी आणि औषधोपचारासाठी वापरलेले साहित्य निरोगी गुरांसाठी वापरू नये.
आ. संसर्गजन्य पशूधनाचे दूध निरोगी पशूधनाच्या आधी काढू नये.
इ. अशा पशूधनाच्या गोठ्यात इतरांना मुक्त प्रवेश ठेवू नये.
ई. रोगग्रस्त परिसरातून पशूधनाची खरेदी आणि विक्री करणे टाळावे.
– पशूवैद्यक बाबूराव लक्ष्मण कडूकर, पशूचिकित्सा विज्ञान आणि पशूसंवर्धन पदवीधर, डी. फार्म, एम्.बी.ए., निवृत्त वरिष्ठ पशूवैद्यकीय अधिकारी (१९.९.२०२२)
लंपी चर्मरोग म्हणजे काय ?लंपी हा गाय आणि म्हैस या पशूधनामध्ये आढळणारा संसर्गजन्य रोग असून तो ‘पॉक्स व्हिरीडी’ या विषाणूमुळे होतो. या विषाणूला ‘निदलिंग विषाणू’ असेही म्हटले जाते. शेळी आणि मेंढी या प्राण्यांमध्ये आढळणार्या देवी रोगांचे विषाणू सदृश्य स्वरूपात असतात. हा रोग दक्षिण आफ्रिका, केनिया, सुदान आणि मध्य आफ्रिका या देशांमध्ये प्रामुख्याने दिसून आला आहे, तसेच ब्रिटीश संघराज्यामध्ये या रोगाचे सदृश्य विषाणू आढळले आहेत. भारतातील राजस्थान या राज्यामध्ये ५० सहस्रांहून अधिक गुरांना या रोगाचा संसर्ग झाला असून ३ सहस्रांहून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. या रोगामध्ये ताप येणे, शरिरातील लसग्रंथींना सूज येणे, तसेच त्वचा, श्वासनलिका आणि अन्नमार्ग यांच्या आतील आवरणांवर २ ते ५ सेंटीमीटर व्यासाच्या आकाराचे फोड येतात. या फोडांमध्ये पाणी होते आणि पायांवर फोड आल्यामुळे जनावर लंगडत रहाते. कातडीची गुणवत्ता अल्प झाल्यामुळे चर्म उद्योजकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी सोसावी लागते. बाधित पशूधन शारीरिकदृष्टीने खंगत जाऊन दुधाचे प्रमाण अल्प होणे, वाढ खुंटणे, वंध्यत्व, गर्भपात आणि काही वेळेला मृत्यूही होतो. या रोगाची सर्वसाधारण लक्षणे, म्हणजे या विषाणूंचा संसर्ग झाल्यापासून एक आठवड्यानंतर हा विषाणू प्राण्याच्या शरिरात पसरतो. प्रारंभीला ४१ डिग्री सेल्सिअस ताप येतो आणि तो एक आठवडाभर अंगात मुरून रहातो. यासमवेतच शरिरातील बाह्य रसग्रंथी मोठ्या होऊन संपूर्ण कातडीवर फोड येतात. डोळे आणि नाक यांतून पू सदृश्य स्राव वहात रहातो. – पशूवैद्यक बाबूराव लक्ष्मण कडूकर |
गोमूत्र उपचाराद्वारे गुरे होत आहेत ‘लंपीमुक्त’ !
‘देवलापार (नागपूर) येथील ‘गो-विज्ञान अनुसंधान केंद्रा’च्या वैद्या नंदिनी भोजराज म्हणाल्या, ‘‘लंपी आजार गुरांसाठी अधिक धोकादायक आहे. त्यावर उपाय म्हणून आम्ही गोमूत्राचा अधिकाधिक वापर केला. यामुळे गुरांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. याखेरीज गुळवेल, हळद, अर्जुन (आजन), अडुळसा आणि कडुलिंब या वनस्पतींचे मिश्रण करून जनावरांना दिले. त्यांचा लाभ संसर्गजन्य गुरांना झाल्याचे आमच्या निदर्शनास आले, तसेच गोठ्यात रात्री कडुलिंब आणि शेणाचा धूर केल्यास कीटक नष्ट होतात. गोठे किंवा गुरे बांधण्याची जागा स्वच्छ ठेवली, तर त्यांना असे आजार होणार नाहीत.’’
गोमूत्रापासून सिद्ध केलेली मिश्रणे कोणताही रोग बरा करू शकतात !
‘गोमूत्रात आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, खनिज मिश्रणे, कार्बाेनिक, ॲसिड, पोटॅश, नायट्रोजन, अमोनिया, मँगनीज, सल्फर, फॉस्फेट, पोटॅशियम, युरिया, युरिक ॲसिड, एन्झाइम्स, सिटोकिन्स, लॅक्टोज आदी द्रव्ये असतात. सिलोकिन्स आणि ॲमिनो ॲसिड हे रोगप्रतिबंधक म्हणून भूमिका बजावतात. त्यामुळे गोमूत्रापासून सिद्ध केलेली मिश्रणे कोणताही रोग बरा करू शकतात’, असे ‘गो-विज्ञान अनुसंधान केंद्रा’ने म्हटले आहे.’
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’, २७.२.२०२२)