सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रतिदिन दीड लाख लिटर दुधाची आवश्यकता; मात्र उत्पादन अल्प

दूध उत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख ५८ सहस्र इतके पशूधन (गाय आणि म्हैस संवर्गाचे) आहे. जिल्ह्याला प्रतिदिन १ लाख ५० सहस्र लिटर इतक्या दुधाची आवश्यकता भासते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ७० ते ८० सहस्र लिटर दुधाचे प्रतिदिन उत्पादन होते. त्यामुळे जिल्ह्यात भासणारा दुधाचा तुटवडा भरून काढण्यासाठी उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम राबण्यासाठी संबंधित विभागांनी परिपूर्ण प्रस्ताव सिद्ध करावेत, असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी दिला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर

जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढीसाठी उपाययोजना करण्याविषयीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या अध्यक्षेतेखाली २६ सप्टेंबर या दिवशी झाली. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पशूसंवर्धन अधिकारी विद्यानंद देसाई, जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त रवींद्र दळवी, कृषी अधिकारी सुनील चव्हाण, कुडाळ गट विकास अधिकारी दुधाच्या उत्पादन वाढीसाठी पशूपालकांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात गोकुळ दूध संघ, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने प्रशिक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यात ११६ दूध संकलन केंद्रे आहेत. यामध्ये अनुमाने २०० ते ३००  लिटर दूध प्रतिदिन संकलित केले जाते. या दूध संकलन केंद्रांशी समन्वय ठेवून आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जातीवंत पशूधन (गाय आणि म्हैस संवर्ग) खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. पशूधन खरेदीसाठी सानुग्रह अनुदानाची तरतूद उपलब्ध आहे. जिल्ह्यात दूध संकलन केंद्रांनी शिफारस केलेल्या पशूपालकांना १ सहस्र पशूधन दुग्ध उत्पादनासाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ‘मुक्त संचार गोठा’ आणि ‘गांडूळ खत प्रकल्प’ या योजनाही प्रभावीपणे राबवण्यात येणार आहेत, असे नायर यांनी या वेळी सांगितले.