गुरुग्राम (उत्तरप्रदेश) येथे गावकर्‍यांनी बंदुकीचा धाक दाखवून रस्ता दुरुस्त करून घेतला !

३० गावकर्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद

गुरुग्राम (उत्तरप्रदेश) – येथील सेक्टर ७८ आणि ७९ मधील रस्त्याचे बांधकाम करणार्‍या गुरुग्राम मेट्रोपोलिटन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीच्या कर्मचार्‍यांना आणि अधिकार्‍यांना धमकावल्याच्या प्रकरणी नवरंगपूर गावातील ३० जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यात ब्लॉक समितीच्या माजी अध्यक्षाचाही समावेश आहे. डोक्यावर बंदूक लावून या ३० जणांनी अधिकार्‍यांना धमकावून गावातील रस्ता दुरुस्त करून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गावातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी  गावकर्‍यांनी बंदुकीचा धाक दाखवून या अधिकार्‍यांकडून काम करून घेतले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खड्डे बुजवण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने खासगी स्वार्थापोटी हा प्रकार घडवून आणला आहे. ब्लॉक समितीचा माजी अध्यक्ष होशियार सिंह याच्या मालिकीच्या पेट्रोल पंपासमोर रस्ता बांधला जावा, अशी त्याची इच्छा होती. सिंह याने थेट प्रशासनाकडे या पंचक्रोशीमधील सर्व गावांना या ठिकाणी रस्ता बांधून हवा असल्याचा दावा केला.