वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ घोषित करण्यासाठी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची राष्ट्रघातकी योजना !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने २२ सप्टेंबर २०२२ या दिवशी देशातील जवळजवळ १२ राज्यांत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’च्या विविध ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडींत १०० हून अधिक जणांना अटकही करण्यात आली आहे. पाटलीपुत्रच्या (बिहार) दौर्‍यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतंकवाद्यांचे लक्ष्य होते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या एक दिवस आधी ‘सिमी’ या बंदी घातलेल्या संघटनेचा आतंकवादी अतहर परवेझ आणि माजी पोलीस अधिकारी महंमद जलालुद्दीन यांना अटकही करण्यात आली. त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ८० लाख रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. पुढे चौकशीअंती ते ‘पी.एफ्.आय.’ आणि ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.)’ यांच्याशी संबंधित होते, असे उघड झाले. ‘भारतीय स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षात म्हणजे वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ म्हणून स्थापित करण्याचे ‘पी.एफ्.आय.’ या आतंकवादी संघटनेचे जिहादी मनसुबे नुकतेच बिहारमध्ये टाकलेल्या एका धाडीत काही कागदपत्रांच्या माध्यमातून अन्वेषण यंत्रणांच्या हाती लागले आहेत. या कागदपत्रांतून उघडा पडलेला जिहादी कट आणि त्याची कार्यपद्धत यांविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

१. ‘पी.एफ्.आय.’ने ‘इंडिया-२०४७ : एक हिंसक योजना’ बनवणे

ए.आय.ए.ने बिहारमध्ये टाकलेल्या धाडीत सापडलेली कागदपत्रे एकूण २५२ पानांची असून मुखपृष्ठावर इंग्रजीमध्ये ‘इंडिया -२०४७ : एम्पॉवरिंग दि पिपल’ (लोकांना सक्षम करणे) आणि ‘एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन’, असे नाव छापलेले आहे. या कागदपत्राचा प्रारंभ होतो, तो पवित्र कुराणाच्या मओळींनी ! ‘जोपर्यंत लोक स्वत:ला पालटणार नाहीत, तोपर्यंत त्यांची परिस्थिती अल्लासुद्धा पालटणार नाही. – पवित्र कुराण, सूरह अर-राद -१३:११’ या कागदपत्रातील संक्षिप्त केलेल्या ८ पानांचे लिखाण नुकतेच बिहार येथे घातलेल्या धाडीत अन्वेषण यंत्रणांच्या हाती सापडला. तो सामाजिक माध्यमांवर प्रसारितही (व्हायरल) झाला आहे.

‘पी.एफ्.आय.’चे हेच ध्येय असून ही कागदपत्रे ‘केवळ अंतर्गत वापरा’साठी असेही त्यात म्हटले आहे. या हिंदुद्वेषी कागदपत्रात प्रारंभीच नमूद करण्यात आले आहे की, भारतात मुसलमान हा संख्येने दुसर्‍या क्रमांकावर असणारा धार्मिक गट आहे. इंडोनेशियानंतर भारतातच मोठ्या प्रमाणात मुसलमानांचे केंद्रीकरण झाले आहे. या कागदपत्रानुसार एकेकाळी देशावर राज्य करणारे मुसलमान आज दुय्यम दर्जाचे मानले जातात.

या कागदपत्रांनुसार ‘ब्रिटिशांनी जी राजकीय सत्ता मुसलमान समुदायापासून हिरावून घेतली, ती वर्ष २०४७ पर्यंत पुन्हा त्यांच्या कह्यात यावी; म्हणून ही पूर्ण योजना आखली आहे. यासह सर्व क्षेत्रांत मुसलमान जनतेला दुय्यम स्थान मिळत असून सध्या देशात हिंदुत्वनिष्ठ प्रवाहाचा उदय झालेला आहे. भारत सरकारला शरीयाविषयी असणार्‍या गोष्टींमध्येही मुसलमानांशी विचारविनिमय करण्याची आवश्यकता वाटत नाही. आज मुसलमान समाजाला प्रभावी नेतृत्व नाही. स्थानिक पातळीवर काही प्रमाणात असले, तरी त्यांना दूरदृष्टी नाही; म्हणूनच ‘पी.एफ्.आय.’च्या नेतृत्वाखाली खर्‍या अर्थाने प्रगती साधणे आवश्यक आहे’, असे अधोरेखित होते.

२. भारताच्या विरोधात सशस्त्र उठाव करण्याची आणि त्यासाठी अन्य इस्लामी देशांचे साहाय्य घेण्याची योजना ‘पी.एफ्.आय.’ने आखणे

भारताच्या विरोधात पूर्ण शक्तीनिशी सशस्त्र उठाव करण्याची ‘पी.एफ्.आय.’ आणि संबंधित जिहादी संघटनांची योजना असून त्यासाठी प्रशिक्षित ‘केडर’ (निवडक प्रशिक्षित व्यक्तींचा गट) निर्मितीच्या सिद्धतेसाठी हे देशविरोधी गट एकवटले आहेत. केवळ पाकिस्तानच नाही, तर तुर्कीयेसारख्या देशाचेही त्यासाठी साहाय्य घेतले जात आहे, तसेच हिंदूंना त्यांच्या गुडघ्यावर नमवण्यासाठी अन्य इस्लामी देशांचे साहाय्य घेणार असल्याचेही स्पष्ट संकेत या कागदपत्रांमध्ये सापडतात.

३. हिंदूंना नमवण्यासाठी ‘पी.एफ्.आय.’च्या मागे असणारे केवळ १० टक्के मुसलमान पुरेसे असणे

या कागदपत्रांत पुढे म्हटले आहे की, इस्लामचा इतिहास जर बघितला, तर मुसलमान हे नेहमीच अल्पसंख्यांक होते. त्यांना यशस्वी होण्यासाठी बहुसंख्यांक होण्याची आवश्यकता नाही. हिंदूंना नमवण्यासाठी ‘पी.एफ्.आय.’च्या मागे असणारे केवळ १० टक्के मुसलमान पुरेसे आहेत. त्यासाठी संघटनेचे सर्व नेते आणि केडर यांनी हा ‘रोड मॅप’ (विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठीची योजना) मनात ठासून घ्यावा.

४. भारताला इस्लामी राष्ट्र करण्यासाठीच्या ध्येयप्राप्तीचे ४ टप्पे

४ अ. पहिला टप्पा – ‘इस्लामी’ ओळख प्रस्थापित करण्यासाठी आक्रमण आणि संरक्षण यांचे प्रशिक्षण देणे : जिथे जिथे शक्य आहे, तिथे मुसलमानांचे ऐक्य साधणे आणि त्यांना ‘पी.एफ्.आय.’च्या झेंड्याखाली एकत्र आणणे. त्यासाठी पक्षाने नवीन सदस्यांची भरती करण्यावर लक्ष केंद्रित करावे. ‘भारतीयत्व’ या पलीकडे जाऊन प्रत्येकाने ‘इस्लामी’ ओळख प्रस्थापित करायची आहे. त्यासाठी ‘फिजिकल एज्युकेशन’ (पी.ए. – शारीरिक शिक्षण) विभागाद्वारे त्यांना आक्रमणाचे, संरक्षण, तलवार चालवणे, रॉड (लोखंडी दांडका) आणि अन्य शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

४ आ. दुसरा टप्पा – ‘राष्ट्रध्वज’, ‘राज्यघटना’ आणि ‘आंबेडकर’ यांचा वापर करून संघटनेचे खरे उद्दिष्ट लपवणे : ‘पी.एफ्.आय.’च्या नेतृत्वाखाली मुसलमानांच्या समस्यांचे निराकरण करणे, त्यासाठी त्यांना पाठबळ देणे, तसेच सुरक्षा यंत्रणांना आपल्या प्रशिक्षित केडरची माहिती मिळू न देता शक्य तिथे हिंसेचा वापर करत स्वतःच्या शक्तीचे प्रदर्शन करणे. याच समवेत योग्य व्यक्तींना हेरून त्यांना बंदुका-स्फोटके वापरायचे आगाऊ प्रशिक्षण देणे. या कालावधीत पक्षाने ‘राष्ट्रध्वज’, ‘राज्यघटना’ आणि ‘आंबेडकर’ यांचा वापर करून स्वतःचे खरे उद्दिष्ट हे इस्लामी राजवट प्रस्थापित करण्याचे आहे’, हे सर्वस्वी लपवावे. ‘एस्.सी.(शेड्यूल कास्ट – अनुसूचित जाती)’, ‘एस्.टी. (शेड्यूल ट्राईब्ज – अनुसूचित जमाती)’ आणि ‘ओबीसी (अदर बॅकवर्ड क्लास – इतर मागास वर्ग)’ यांच्याशी जवळीक साधावी. कार्यकारी आणि न्यायालयीन पातळीवर, सर्व स्तरांवर संघटनेची माणसे पेरून माहिती काढावी. अन्य इस्लामी देशांचे साहाय्य घेऊन निधी मिळवावा.

४ इ. तिसरा टप्पा – रा.स्व. संघ आणि एस्.सी., एस्.टी. अन् ओबीसी यांच्यात फूट पाडणे आणि प्रत्येक पातळीवर १० टक्के जागा जिंकण्याचे ध्येय ठेवणे : पक्षाने मुसलमानांच्या ५० टक्के, तसेच एस्.सी., एस्.टी. आणि ओबीसी यांच्याशी जवळीक साधून त्यांच्या १० टक्के जागा प्रत्येक पातळीवर जिंकाव्यात. रा.स्व. संघ आणि एस्.सी., एस्.टी. अन् ओबीसी यांच्यात फूट पाडावी. ‘रा.स्व. संघ केवळ उच्च जातींच्या हिंदूंची संघटना आहे’, असा प्रचार करावा. सध्याच्या तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांना त्यांच्या निधर्मीपणाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करून मुसलमान, एस्.सी., एस्.टी. आणि ओबीसी यांचे हित जोपासावे.

शारीरिक शिक्षण विभागाने गणवेशात मोर्चे काढणे, आवश्यकता वाटेल तिथे आक्रमण करणे, हे काम चालूच ठेवावे. या टप्प्यावर शस्त्रास्त्रे आणि स्फोटके यांची जमवाजमव करून साठा सिद्ध ठेवावा.

४ ई. चौथा टप्पा – देशात राजकीय सत्ता स्थापून विरोधकांचा पद्धतशीरपणे नायनाट करणे आणि इस्लामी वैभव परत आणणे : या शेवटच्या टप्प्यावर पक्षाने सर्व शक्तीशाली नेतृत्व म्हणून पुढे यावे. संपूर्ण मुसलमान समाजाचे नेतृत्व आणि एस्.सी., एस्.टी. अन् ओबीसी यांच्या ५० टक्के जागा जिंकाव्यात. राष्ट्रीय पातळीवर राजकीय सत्ता मिळेल, इतका पाठिंबा त्यांना मिळाला पाहिजे. एकदा सत्ता हस्तगत केल्यानंतर कार्यकारी (प्रशासन), न्यायव्यवस्था, पोलीस आणि सैन्य यांत महत्त्वाच्या जागांवर संघटनेची माणसे नियुक्त करावीत. सर्व सरकारी जागांवर मुसलमान आणि एस्.सी., एस्.टी. अन् ओबीसी यांची नियुक्ती करावी, जेणेकरून पूर्वी या समाजावर झालेला अन्याय आणि असंतुलन या नियुक्त्यांमुळे सुधारता येईल.

या टप्प्यावर शारीरिक शिक्षण विभाग अगदी प्रभावी व्हावा. संघटनेच्या हितसंबंधाच्या आड येणार्‍या प्रत्येकाला त्यांनी सरसकट ठार करावे. संघटनेच्या विरोधकांच्या सुरक्षा यंत्रणांच्या विरोधात या विभागाने संरक्षणाचे काम करावे. संघटनेकडे शस्त्रास्त्रांचा पुरेसा साठा आल्यावर इस्लामच्या तत्त्वांवर आधारित राज्यघटना आपण घोषित करून ती लागू करावी. या टप्प्यात परकीय साहाय्यसुद्धा मिळेल. आपल्या विरोधकांचा पद्धतशीरपणे व्यापक प्रमाणात नायनाट केला जाईल आणि इस्लामी वैभव परत येईल.

(क्रमश:)

– रूपाली कुळकर्णी-भुसारी (साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)