औरैया (उत्तरप्रदेश) येथे शिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू  झाल्यानंतर हिंसाचार !

पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ

औरैया (उत्तरप्रदेश) – येथे शिक्षकाने केलेल्या मारहाणीत घायाळ झालेल्या १५ वर्षीय दलित विद्यार्थ्याचा उपचार चालू असतांना मृत्यू झाल्यानंतर हिंसक आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांच्या २ गाड्या पेटवून दिल्या, तर २ खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. आरोपी शिक्षकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८, ३२३, ५०४ आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गंत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर शिक्षक पसार झाला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परीक्षेत चुकीची उत्तरे लिहिल्यावरून शिक्षकाने पीडित मुलाला ७ सप्टेंबरला मारहाण केली होती. त्यामुळे मुलाला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मारहाणीच्या विरोधात वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता. शिक्षकाने मुलाच्या उपचारांचा पूर्ण खर्च देण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र त्याने केवळ ४० सहस्र रुपये दिले. उर्वरित पैशांची मागणी केल्यानंतर शिक्षकाने जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप वडिलांनी केला.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारचा हिंसाचार होऊन वित्तहानी होणे, हे पोलिसांना लज्जास्पद !