छत्रपती शिवरायांना अभिवादनाव्यतिरिक्त अन्य विधींना रायगडावर अटकाव करावा !

छत्रपती संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई – दुर्गराज रायगडावर विशेषत: राजसदर, शिवसमाधी परिसर, होळीचा माळ, बालेकिल्ला परिसर आदी ठिकाणी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचे विधी करण्यास अटकाव करण्यात यावा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. रायगडावर श्राद्धविधी विधी करत असल्याचा एक ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर नुकताच प्रसारित झाला होता. याविषयी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात संभाजीराजे भोसले यांनी लिहिले आहे की, अशा घटनांमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जाऊन असंतोषाचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहविभाग आणि केंद्रीय पुरातत्व विभाग यांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात.

रायगडावर श्राद्धविधी विधी करतांनाचा व्हिडिओ हा ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या संशोधन संस्थेत अधिकारी पदावर राहिलेले श्री. राम धुरी यांचा आहे. ते गडकोटप्रेमी असून वीरगती प्राप्त झालेल्या मावळ्यांसाठी रायगडावर श्राद्धविधी करतात. रायगडाखालील खेड्यांत अनेकविध सामाजिक उपक्रम राबवण्यात ते सक्रीय असतात.

रायगडावरील धार्मिक कार्यक्रमाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडकडून कारवाईची मागणी !

मुंबई – रायगडावर धार्मिक विधी करणार्‍यांवर कारवाई करावी. रायगडावर करण्यात आलेला अवैध धार्मिक विधी अतिशय गंभीर आहे. गडावर पोलीस पहारा असतांना असा प्रकार घडतोच कसा ? याचा अर्थ पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या संगनमताने असे प्रकार होतात. सरकारने याची नोंद घ्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या कबरीचा विस्तार, तसेच रायगड, विशालगड, लोहगड, कुलाबा आदी गडांवर धर्मांधांनी केलेले अवैध बांधकाम या विरोधातही संभाजी ब्रिगेडने आवाज उठवावा !