बांगलादेशी घुसखोरांना घर भाड्याने देणार्‍यांवर कारवाई होणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी, २५ सप्टेंबर (वार्ता.) – गेल्या १० दिवसांत गोव्यात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या एकूण ३२ बांगलादेशी घुसखोरांना कह्यात घेण्यात आले असून गेल्या ३ वर्षांतील ही संख्या ४१ आहे. यांपैकी ६ जणांना आतापर्यंत बांगलादेशात परत पाठवण्यात आले असून इतरांनाही पाठवले जाणार आहे. आतापर्यंत ज्या बांगलादेशींना कह्यात घेण्यात आले आहे, त्यांची संबंधित घरमालकाने कोणतीही पडताळणी केली नसल्याचे किंवा भाडेकरूंविषयी पोलिसांनाही माहिती दिली नसल्याचे लक्षात आले आहे. बांगलादेशी घुसखोरांना घर भाड्याने देणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘घरमालकाने भाडेकरू ठेवतांना भाडेकरूंची पडताळणी करून पोलिसांनाही याविषयी माहिती द्यायला पाहिजे; मात्र याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. आपली माहिती लपवून भाडेपट्टीवर रहाणारे पुढे गुन्हेगारीमध्ये सक्रीय होत असल्याचे आढळून आले आहे. बांगलादेशी घुसखोरांना भाड्याने घर दिलेल्यांचे सखोल अन्वेषण केले जाणार आहे.’’

ओडली, सासष्टी येथून ४ बांगलादेशी घुसखोर कह्यात

ओडली, सासष्टी येथील एका भंगारअड्डयात रहाणारे शहीन फझल करीम आणि करीम या २ बांगलादेशी घुसखोरांना कोलवा पोलिसांनी २५ सप्टेंबर या दिवशी कह्यात घेतले. हे दोघेही बांगलादेश येथील धर्मगंज आणि नारायणगंज या भागांतील आहेत. करीम याला दोन लहान मुले आहेत. मडगाव पोलिसांच्या विशेष विभागाला आणखी ४ नागरिक सापडले आहेत आणि ते बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता आहे. हे नागरिक बांगलादेशी घुसखोर असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे, असे मडगाव पोलिसांनी सांगितले. (पोलिसांना एकापाठोपाठ बांगलादेशी आताच कसे काय सापडायला लागले ? एका ठिकाणी सापडल्यावर इतरत्रचे पोलीस सतर्क झाले का ? आता सापडणारे बांगलादेशी अनेक वर्षांपासून वास्तव्याला असणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)

बांगलादेशी घुसखोरांकडे आधार कार्ड सापडल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली

‘आधार कार्ड’ सिद्ध करण्याचे दायित्व सध्या एका खासगी संस्थेला दिलेले आहे आणि या ठिकाणी कुणीही जाऊन ‘आधार कार्ड’ बनवू शकतो. याविषयी केंद्रीय गृह मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.  बांगलादेशी घुसखोरांकडे आधार कार्डे सापडल्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री डॉ. सावंत उत्तर देत होते.