दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र या काळात नाचगाणे, मौजमजा, मद्यपान करणे यांमुळे ‘सण-उत्सव अशाच पद्धतीने साजरे करायचे असतात’, अशी एक चुकीची अन् विकृत मानसिकता पुढच्या पिढीत दृढ होत चालली आहे. प्रसारमाध्यमेही या सणांचे बीभत्स स्वरूप आकर्षक पद्धतीने दाखवत आहेत. त्यामुळे सण-उत्सव साजरे करण्याविषयी चुकीचा ठसा नवीन पिढीच्या मनावर उमटत आहे. याचाच अपलाभ घेत पुणे येथील कॅम्प परिसरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘सत्यम शिवम् सुंदरम्’ फाऊंडेशनच्या वतीने ‘सेक्स तंत्र’ नावाने तरुणांना लैंगिक प्रशिक्षण देण्याचा घाट घातला होता. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधामुळे पुण्यात होणारे हे शिबिर रहित करावे लागले. पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा नोंदवला असला, तरी असे का घडले ?’ याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
सध्या गणेशोत्सवाप्रमाणे गल्लोगल्ली देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून नवरात्रोत्सव मंडळे चालू झाली आहेत. अनेक ठिकाणी मंडळे नसली, तरी गरबा आणि दांडिया यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. गरबा हा एक ‘इव्हेंट’ (उपक्रम) झाला असून त्यासाठी ५०० रुपयांपासून सहस्रो रुपयांपर्यंतची तिकिटे लावून त्याचे आयोजन केले जाते. तरुण-तरुणी तोकड्या कपड्यांमध्ये एकमेकांशी स्पर्धा आणि मौजमजा करत चित्रपटातील गाण्यांवर गरबा खेळतात, त्यात देवीप्रती भावभक्ती नसते. काही ठिकाणी चित्रपट अभिनेते, अभिनेत्री गरब्यामध्ये सहभागी होतात. त्या वेळी केवळ त्यांना पहाण्यासाठी झुंबड उडालेली पहायला मिळते. उत्कृष्ट वेशभूषा, आकर्षक जोडी, ‘दांडिया किंग’, ‘दांडिया क्विन’, अशा विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. त्यामुळे नवरात्रोत्सव हा केवळ दिखावा करण्याचा भाग झाला असून दुर्दैवाने याविषयी कुणालाच काही आक्षेपार्ह वाटत नाही, हे दुर्दैवी आणि संतापजनक आहे. एवढेच नसून ‘हाच उत्सवांमधील आनंद आहे’, असा अपसमज आजच्या पिढीच्या अंगवळणी पडत आहे. या कृतींमुळे आपण देवीच्या कृपेला पात्र होणार नाही, याचे भान कुणाला नाही.
नवरात्रोत्सव म्हणजे आपल्यातील श्री दुर्गादेवीची शक्ती जागृत करणे ! देवीची कृपा संपादन करून घेण्यासाठी गरबा खेळणे. गरबा खेळतांना आपण स्वतःला विसरून देवीच्या भजनात रममाण होणे, तिला अनुभवणे ! आपल्यातील शक्तीतत्त्व जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध होणे, ही हिंदु संस्कृती आहे.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे