सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती
मुंबई – पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबरपासून राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्ग येथील खड्डे दुरुस्तीला प्रारंभ करण्यात येणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत सर्व खड्ड्यांचे काम पूर्ण होईल. यासाठी ५०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सतीश साळुंखे यांनी दिली. पावसामुळे आणि निकृष्ट कामामुळे राज्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांत पडून अनेकांचे अपघात होऊन काहींना प्राण गमावावे लागले आहेत.
गेल्या आठवड्यात झालेल्या अभियंतादिनाच्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी अभियंत्यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर सचिवांनी वरील निर्णय तातडीने घेतला आहे. खड्डे भरण्याचे काम वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या निधीतून केले जाणार आहे.
महामार्ग आणि जिल्हा महामार्ग मिळून जवळपास ९८ सहस्र किलोमीटर लांबीचे रस्ते असून त्यांवर ३५ ते ४० टक्के खड्डे आहेत. त्यासाठी साधारणतः ५०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.