कवळे, फोंडा, गोवा येथील सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी (वय ८९ वर्षे) यांची भेट घेतली असता त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये

‘२०.९.२०२२ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता मी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या जवळच कवळे येथे रहाणार्‍या सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांना भेटायला गेलो होतो. त्यांचे वय ८९ वर्षे आहे आणि वयोमानानुसार त्या आता थकल्या आहेत. त्यांना आता चालण्याची ताकद नसल्याने आणि उठून बसवावे लागत असल्याने त्या झोपून असतात. त्यांना भेटल्यावर मला त्यांची पुढील वैशिष्ट्ये लक्षात आली.

सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी

१. ‘तुम्ही आलात, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच आले आहेत’, असे सद्गुरु कुवेलकरआजी यांनी आम्हाला बघून म्हणणे

आम्ही सद्गुरु कुवेलकरआजी यांच्या घरी गेल्यावर त्यांनी आम्हाला ओळखले आणि लगेच नमस्कार केला. त्यांच्या तोंडवळ्यावर आनंद पसरला. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही आलात, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच आले आहेत.’’

२. सद्गुरु कुवेलकरआजी यांचा हात कापसासारखा, तसेच प्रीतीमय मऊ जाणवणे आणि त्यांचा तळहात चैतन्याने पिवळसर झाल्याचेही दिसणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सद्गुरु कुवेलकरआजी यांचा हात हातात घेतला आणि मला म्हणाल्या, ‘‘यांचा हात किती कापसासारखा मऊ झाला आहे ! तसेच त्यांच्या कांतीवर (त्वचेवर) चमक आली आहे. तुम्हीही यांचा हात हातात घेऊन बघा.’’ मी सद्गुरु आजींचा हात हातात घेतल्यावर त्यांच्या हाताचा स्पर्श मला प्रीतीमय मऊ जाणवला. तसेच मला त्यांचा तळहात चैतन्याने पिवळसर झाल्याचेही दिसले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

३. सद्गुरु कुवेलकरआजी यांच्या तोंडवळ्यावर मला गुलाबी छटा आलेलीही दिसली !

सद्गुरु आजींनी साधना करून प्राप्त केलेले ‘सद्गुरु’ हे पद आणि त्यांचा सगळ्यांवर प्रीती करण्याचा स्वभाव, यांमुळे त्यांच्या तोंडवळ्यावर गुलाबी छटा आल्याचे मला जाणवले.

४. सद्गुरु कुवेलकरआजी पलंगावर आडव्या पडलेल्या होत्या. मला त्यांच्या देहाभोवती साधारण १५ सें.मी. जाडीचे चैतन्याचे वलय असल्याचे जाणवले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

५. ‘सद्गुरु कुवेलकरआजी यांच्या खोलीत भरभरून चैतन्य आहे’, असे जाणवणे आणि याची कारणे सद्गुरु आजींचे वास्तव्य अन् घरात सर्वजण साधक असणे, ही असणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘सद्गुरु कुवेलकरआजी यांच्या खोलीत भरभरून चैतन्य आहे’, असे जाणवले. मलाही त्या खोलीत पुष्कळ छान वाटत होते आणि आनंद जाणवत होता. अगदी सनातनच्या आश्रमात जसे चैतन्यमय वातावरण असते, तसेच येथेही जाणवत होते. याचे कारण म्हणजे सद्गुरु कुवेलकरआजी यांचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी सतत असलेले अनुसंधान ! तसेच त्यांच्या घरी सर्व साधकच आहेत. त्यांचा मोठा मुलगा श्री. मनोज (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), तसेच त्यांचा धाकटा मुलगा श्री. नागराज (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि त्यांची पत्नी सौ. रूपा हे सर्वजण आश्रमात येऊन साधना करतात. सर्वजण साधनेत असल्यामुळे घरीही सात्त्विक वातावरण आहे. याला सद्गुरु कुवेलकरआजी यांचे सुसंस्कार हेच कारणीभूत आहेत.

६. सद्गुरु कुवेलकरआजी यांना या वयातही स्पष्टपणे ऐकू येत असणे, त्यांचा आवाजही स्पष्ट असणे, तसेच त्या चष्मा न लावता वाचू शकत असणे

सद्गुरु आजी आमच्याशी बोलत होत्या. तेव्हा लक्षात आले, ‘त्यांचे बोलणे एकदम स्पष्ट ऐकू येत आहे, तसेच त्यांना ऐकायलाही व्यवस्थित येत आहे.’ हे त्यांचा मुलगा श्री. नागराज यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘त्या दैनिक ‘सनातन प्रभात’ संपूर्ण वाचतात आणि त्यासाठी त्यांना चष्मा लागत नाही.’’

डावीकडून उभे श्री. मनोज कुवेलकर (ज्येष्ठ पुत्र), श्री. नागराज कुवेलकर (कनिष्ठ पुत्र), सौ. रूपा कुवेलकर (धाकटी सून) आणि बसलेल्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी

७. स्मरणशक्ती चांगली असणे

सद्गुरु आजी आमच्याशी मागचे संदर्भ देऊन व्यवस्थित बोलत होत्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी (२८.८.२०२२ या दिवशी) तुमच्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी चांगले लिहिले होते.’’ त्यात त्यांनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सूक्ष्मातील उपायांच्या कार्याचे उत्तराधिकारी सद्गुरु गाडगीळकाका आहेत’, असे आता सप्तर्षी सांगतील’, असे मला वाटते’, असे म्हटले होते. यावरून लक्षात आले, ‘सद्गुरु आजी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सर्व मजकूर वाचतात आणि तो सर्व त्यांच्या लक्षात रहातो.’

८. सद्गुरु आजी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आपला भाऊ मानत असणे

त्या म्हणतात, ‘मागील जन्मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे माझे सख्खे भाऊ होते.’

९. सद्गुरु कुवेलकरआजींना ‘सनातनच्या आश्रमातून महाप्रसादाचे ताट मिळावे’, अशी इच्छा झाल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘तुमची सून सौ. रूपा ही अन्नपूर्णाच आहे आणि तिने बनवलेला महाप्रसाद म्हणजे आश्रमातील महाप्रसादच आहे !’, असे सूक्ष्मातून मार्गदर्शन करणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी सद्गुरु आजी सूक्ष्मातून बोलत असतात आणि तेही त्यांना सूक्ष्मातून मार्गदर्शन करत असतात. हल्ली एकदा सद्गुरु आजींना वाटले, ‘आपल्याला सनातनच्या आश्रमातून महाप्रसादाचे ताट मिळावे.’ तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी त्यांना सूक्ष्मातून सांगितले, ‘तुमची सून सौ. रूपा ही अन्नपूर्णाच आहे. तिने बनवलेला महाप्रसाद म्हणजे आश्रमातील महाप्रसादच आहे !’

१०. सद्गुरु कुवेलकरआजींनी आतापर्यंत त्यांची कुलदेवी श्री शांतादुर्गादेवी हिचे सर्व कुलाचार मनोभावे आणि न चुकता केल्याने देवीने त्यांना ‘आता मी तुझ्याकडे लक्ष देणार असून तुझे सर्वकाही मी करणार आहे !’, असे सांगणे

सद्गुरु आजींची त्यांच्या घराजवळच असलेली श्री शांतादुर्गादेवी ही कुलदेवी आहे. त्यांनी इतकी वर्षे सर्व कुलाचार व्यवस्थित पाळले. आता त्या वयोमानानुसार थकल्या असल्याने या वर्षी त्यांना स्वतःला काही करता येणार नाही. तेव्हा देवी त्यांना सूक्ष्मातून म्हणाली, ‘तू आता याची काळजी करू नकोस. तू इतकी वर्षे माझी सर्व सेवा मनोभावे न चुकता केलीस. आता मी तुझ्याकडे लक्ष देणार आहे. तुझे सर्वकाही मी करणार आहे !’

११. दोन्ही मुलगे आणि सून चांगली साधना करत असल्याने सद्गुरु कुवेलकरआजींना आता त्यांची काळजी वाटत नसणे आणि ‘आता आपण सर्व कर्तव्यांतून मुक्त झालो आहोत’, असे त्यांना वाटणे

सद्गुरु आजी म्हणाल्या, ‘‘आता मला माझा मोठा मुलगा श्री. मनोज, धाकटा मुलगा श्री. नागराज आणि त्याची पत्नी सौ. रूपा यांची काही काळजी वाटत नाही. याचे कारण म्हणजे आता सर्वजण चांगली साधना करत आहेत. ते श्री गुरुचरणी आहेत. त्यामुळे आता मी सर्व कर्तव्यांतून मुक्त झाले आहे.’’

१२. सद्गुरु कुवेलकरआजींनी ‘आता मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले श्रीविष्णूच्या चरणी नेणार आहेत’, असे सांगणे

सद्गुरु आजी आम्हाला म्हणाल्या, ‘‘आता मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले श्रीविष्णूच्या चरणी नेणार आहेत. त्याची वेळ आता जवळ आली आहे. केवळ माझे त्यांना एवढे एकच मागणे आहे की, त्यांनी मला पितृपक्ष संपल्यावर आणि नवरात्रीची पंचमी झाल्यावर (प्रतिवर्षी नवरात्रीच्या पंचमीला त्यांच्या घरातून श्रीशांतादुर्गादेवीला नैवेद्य दाखवला जातो.) मला केव्हाही श्रीविष्णूच्या चरणी न्यावे.’’ ‘सद्गुरु आजींना आता हा देह सोडून श्रीविष्णूच्या चरणी जाण्याची ओढ लागली आहे’, असे मला जाणवले. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘सद्गुरु आजी, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या मनात आहे, तसे होईल.’’

अशा प्रकारे आमची सद्गुरु आजींशी संस्मरणीय आणि आनंदाच्या वातावरणात भेट झाली. शेवटी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेला खाऊ दिला. आम्ही दोघांनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांचा अन् त्यांच्या घरच्यांचा निरोप घेतला. तेव्हा सद्गुरु आजी पुष्कळ आनंदी होत्या. आमच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले भेटल्याने त्या आनंदाने तृप्त झाल्या होत्या.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२०.९.२०२२)