पणजी, २२ सप्टेंबर (वार्ता.) – आंतरराज्य अमली पदार्थ व्यवहाराचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी गुजरात, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंधप्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांतील पोलीस प्रमुखांची गोव्यातील पोलीस प्रमुखांशी एक महत्त्वाची बैठक झाली आहे. गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, ‘‘विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या अमली पदार्थ व्यवहाराविषयी गोपनीय माहिती आदानप्रदान करणे, अमली पदार्थ व्यावसायिकांवर कारवाई करणे, आदींच्या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा झाली. एका राज्याच्या पोलीस अधिकार्याने ‘डार्क वेब’च्या माध्यमातून कशा प्रकारे अमली पदार्थाचा व्यवसाय केला जातो, याविषयी सविस्तर माहिती दिली. या माहितीच्या आधारे गोव्यातही कारवाई करणे शक्य होणार आहे.’’
Goa police chalk out plan to act against drug mafia https://t.co/UuIS3iZE6O
— TOI Goa (@TOIGoaNews) September 22, 2022
‘हिल टॉप’ उपाहारगृहाच्या मालकाला भाग्यनगर येथे नेण्यास न्यायालयाकडून ‘ट्रान्सिट रिमांड’
भाग्यनगर पोलिसांनी अमली पदार्थ व्यवसायावरून २१ सप्टेंबर या दिवशी वागातोर येथील ‘हिल टॉप’ उपाहारगृहाचा मालक जॉन स्टिफन डिसोझा याला कह्यात घेतले होते. कह्यात घेण्यात आल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याला अन्वेषणासाठी भाग्यनगर येथे नेण्यास म्हापसा येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने २ दिवसांचा ‘ट्रान्सिट रिमांड’ दिला आहे.
कोलवाळ येथे १ किलो गांजासह दोघे जण कह्यात
कोलवाळ पोलिसांनी संशयित रतन आवळे आणि अब्बास खरूशी या दोघांना सोबत अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कोलवाळ येथील हाऊसिंग बोर्ड येथून कह्यात घेतले आहे. संशयितांकडून १ किलो गांजा कह्यात घेण्यात आला. संशयितांनी महाराष्ट्रातून एका ठिकाणावरून हे अमली पदार्थ गोव्यात आणले होते. कोलवाळ पोलीस २३ सप्टेंबर या दिवशी अमली पदार्थाचा पुरवठा करणार्याच्या शोधात महाराष्ट्रात जाणार आहेत.