मुंबईवर हक्क सांगण्याच्या भानगडीत पडू नका ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

उद्धव ठाकरे

मुंबई – मुंबईकरांनी २५ वर्षे विश्वास दाखवला. कसाबचे आक्रमण असा वा नैसर्गिक आपत्ती असो शिवसैनिकांनीच साहाय्य केले आहे; परंतु ज्यांना शिवसेनेने मोठे केले, ज्या सेनेने पदे दिली, त्यांनीच दगा केला. मुंबईवर हक्क सांगण्याच्या भानगडीत पडू नका, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी २१ सप्टेंबर या दिवशी मुंबईमध्ये सार्वजनिक सभेत केले.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘शिवसेना आणि मुंबईकर यांचे नाते घट्ट आहे. आम्ही मुंबईकरांना जी वचने दिली ती पूर्ण केली. ५०० फुटापर्यंत मालमत्ता कर रहित करण्याचे वचन आम्ही पूर्ण केले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या बाहेर प्रवेशासाठी रांग असते, हे शिवसेनेचे कर्तृत्व आहे. प्रदूषणमुक्त बस शिवसेनेने आणल्या. संपूर्ण देशात आरोग्याविषयक सुविधा आम्ही महाराष्ट्रात वाढवली आहे. मुंबईमध्ये जागतिक दर्जाचे मत्स्यालय वरळी डेअरी येथे झाले पाहिजे. धारावीमध्ये आर्थिक केंद्र झाले पाहिजे. मुंबई तुमच्यासाठी विकण्याची भूमी असेल; परंतु आमुची मातृभूमी आहे. ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी आहे; देहलीपुढे झुकणारी नाही. शिवरायांचा इतिहास वाचत शिवसैनिक मोठे झाले आहेत. तुम्ही आम्हाला जमीन दाखवणार असाल, तर आम्ही तुम्हाला आसमान दाखवल्याविना रहाणार नाही.’’