सध्याच्या लोकशाहीत हिंदूंना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय मिळत नसल्याने त्यांना हक्काचे हिंदु राष्ट्र मिळालेच पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

  • पनवेल येथे हिंदूसंघटन मेळावा !

  • हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करून संघटितपणे धर्मकार्य करण्याचा उपस्थित हिंदूंचा निर्धार !

श्री. रमेश शिंदे

पनवेल, २१ सप्टेंबर (वार्ता.) – देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे राज्यघटनेतील ४ मूलभूत अधिकार मिळाले पाहिजेत; मात्र धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली या देशात केवळ अल्पसंख्यांकांना विशेष सवलती देऊन देशात बहुसंख्य असतांनाही हिंदूंना ‘दुय्यम दर्जाचा नागरिक’ म्हणून वागणूक दिली जात आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय सध्याच्या लोकशाहीत हिंदूंना मिळत नसल्याने त्यांना आपल्या हक्काचे हिंदु राष्ट्र मिळालेच पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात उपस्थित हिंदु धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

हिंदूसंघटन मेळाव्यात उपस्थित हिंदू

समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’च्या अंतर्गत आयोजित या मेळाव्याला ‘करणी सेने’चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. अजय सिंह सेंगर, कळंबोली येथील ‘गौरव क्लासेस’चे संचालक श्री. संतोष वर्तक, कामोठे येथील श्री. गुरुराज कुलकर्णी, तर कुलाबा जिल्हा संपर्कप्रमुख आणि जनकल्याण समितीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख आदी मान्यवरांसह शेकडो धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. या कार्यक्रमाचे ‘जागो हिंदु रायगड’ या समितीच्या ‘फेसबूक पेज’वरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्याचा सहस्रो हिंदूंनी लाभ घेतला.

या कार्यक्रमात समितीच्या देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी, तसेच विनामूल्य चालू असलेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाविषयी चित्रफीत दाखवण्यात आली. उपस्थित धर्मप्रेमींनी राष्ट्र आणि धर्मकार्य करतांना त्यांना आलेल्या अनुभवांविषयी सांगितले. रायगड जिल्ह्यात समितीच्या चालू असलेल्या कार्याविषयी समितीचे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. योगेश ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन संघटितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार उपस्थित धर्मप्रेमींनी केला.

रायगड जिह्यात ५ ठिकाणी ‘हलाल जिहाद’ या विषयावर व्याख्यानांचे आयोजन !

हिंदु जनजागृती समितीला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘हिंदु राष्ट्र संकल्प मास’ या अभियानांतर्गत ‘हलाल जिहाद’ या विषयावर रायगड जिह्यात ५ ठिकाणी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. त्यात समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ‘हलाल जिहाद’ म्हणजे हिंदु धर्म आणि भारतीय अर्थव्यवस्था यांच्यावर आलेले मोठे संकट आहे. त्यासाठी हिंदूंनी जागृत आणि संघटित होऊन विरोध करणे महत्त्वाचे आहे’, असे त्यांनी सांगितले. या वेळी श्री संप्रदाय, वारकरी संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ, व्यापारी, युवा धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या व्याख्यानाचा लाभ १८७ जणांनी घेतला. ‘फेसबूक लाईव्ह’द्वारेही अनेकांनी यांचा लाभ घेतला. व्याख्यान ऐकल्यावर ३ ठिकाणी ‘कृती समिती’ स्थापन करण्याचे ठरले.