गोव्यात स्थानिक विक्रेत्यांकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीतून माहिती झाली उघड

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती (प्रतिकात्मक छायाचित्र)

पणजी, १८ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात बंदी असूनही श्री गणेशचतुर्थीला स्थानिक विक्रेत्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री केल्याची माहिती उघड झाली आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने विक्रीस ठेवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तींच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली होती. प्रयोगशाळांमध्ये मूर्तींमध्ये ‘कल्शियम सल्फेट’ या प्लास्टर ऑफ पॅरिसपासून निर्माण होणार्‍या रसायनाचे प्रमाण तपासण्यात आले होते. याद्वारे पणजी, म्हापसा, मांद्रे, माशेल, मडगाव, शिवोली आणि खोर्ली येथून एकूण ९ विक्रेत्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री केल्याचे उघड झाले.


#SadStory- Govt gives grant to Ganesh Idol makers using POP !

(सौजन्य : ingoanews)

_____________________________

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने श्री गणेशचतुर्थीला प्रारंभ होण्याच्या सुमारे १० दिवस अगोदर राज्यभरात श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्‍या दुकानांमधून श्री गणेशमूर्तींचे एकूण ३६ नमुने घेतले होते. (राज्यभरात केवळ ३६ च ठिकाणांहून श्री गणेशमूर्ती विकल्या जातात का ? प्रशासनाची निष्क्रीयताच यातून दिसून येते ! – संपादक) या श्री गणेशमूर्तींमध्ये ‘कॅल्शियम सल्फेट’ हे रसायन ४३ ते ७९ टक्क्यांपर्यंत आढळले. शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तीमध्ये ‘कॅल्शियम सल्फेट’चे जे प्रमाण आढळते, त्यापेक्षा हे प्रमाण सुमारे ४ ते ७ पट अधिक होते. सर्वसाधारण मातीत ‘कॅल्शियम सल्फेट’ चे प्रमाण ०.६ ते ३.०६८ टक्क्यांपर्यंत असते. मंडळाने प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल पुढील कारवाईसाठी पर्यावरण खात्याकडे सुपुर्द केला आहे. या अंतर्गत कारवाई झाल्यास संबंधित विक्रेत्याची अनुज्ञप्ती रहित होण्याची शक्यता आहे, तसेच संबंधित विक्रेत्यांनी यापुढे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री  करू नये यासाठी त्यांची नावे उद्योग आणि वाणिज्य खाते यांना पाठवले जाऊ शकते. गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बनवल्या जात नसल्याने अशा मूर्ती गणेशचतुर्थीच्या पूर्वी शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधून आयात केल्या जातात. वजनाने हलक्या, तसेच दिसण्यास आकर्षक आणि स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने अशा मूर्तींना वाढती पसंती असते.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने अशा मूर्ती बनवणे किंवा त्यांची विक्री करणे यांवर राज्यात वर्ष २००८ पासून बंदी घालण्यात येत आहे. बंदी आदेशाचे पालन न करणार्‍यांवर पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ चे कलम १५ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते; मात्र अशी कारवाई केली जात नसल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची सर्रासपणे विक्री केली जात आहे. यंदा राज्याच्या सीमांवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची आयात रोखण्यासाठी अबकारी खाते आणि पर्यावरण खाते यांच्या अधिकार्‍यांचा एक गट नेमण्यात आला होता; मात्र तरीही अनेक विक्रेत्यांनी परराज्यातून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची आयात केली.

विसर्जनानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीं अशा अवस्थेत परत येतात !

(ही छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ही प्रशासनाची निष्क्रीयताच ! अशी माहिती श्री गणेशचतुर्थीच्या १५ दिवसांनंतर कळून काय उपयोग ? ही तपासणी श्री गणेशमूर्ती सिद्ध होतात, तेव्हाच राज्यभर करायला हवी होती.
  • प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बनवल्यामुळे झालेले जलप्रदूषण आणि श्री गणेशमूर्ती पाण्यात न विरघळल्यामुळे तरंगत किनार्‍यावर आल्याने झालेले देवतेचे विडंबन याला सर्वस्वी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळालाच उत्तरदायी का धरू नये ?