कोलकाता – बंगालमधील मालदा जिल्ह्यातील सुखदेवपूर येथे भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारतीय सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ३५९ भ्रमणभाष संच जप्त केले. सुखदेवपूर येथील सीमा चौकीवर तैनात असलेल्या सैनिकांना १० ते १२ तस्कर काही गठ्ठे घेऊन जात असल्याचे दिसले. सैनिक त्यांच्या दिशेने येत असल्याचे दिसताच अंधार आणि झुडपे यांचा लाभ घेत तस्करांनी पलायन केले. नंतर झडतीच्या वेळी सैनिकांना तारबंदीजवळील खड्ड्यात ८ गठ्ठे सापडले. ‘यामध्ये विविध आस्थापनांचे ३५९ भ्रमणभाष संच होते आणि त्यांची किंमत अंदाजे ३९ लाख २९ सहस्र रुपये एवढी आहे’, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली. या तस्करीत सहभागी असलेल्या अनेक तस्करांची नावे समोर आली असून त्यांच्या विरोधात बैष्णवनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. तसेच जप्त केलेले भ्रमणभाष पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.
सीमा सुरक्षा दल भारत-बांगलादेश सीमेवर तस्करी रोखण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. तस्करीच्या कारवायांमध्ये गुंतलेल्यापैकी काही जणांना पकडण्यात आले आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्याने दिली.