ब्रिटनमध्ये ‘स्मार्टफोन’चा वापर करणारी ६५ टक्के मुले १९ व्या वर्षी होतात नैराश्यग्रस्त !

प्रतीकात्मक छायाचित्र

लंडन – जगभरात ‘स्मार्टफोन’चा (भ्रमणभाषचा) वापर वाढत असून यामध्ये ९ ते १९ वर्षे वयोगटातील मुले याचा सर्वाधिक वापर करत असल्याचे समोर आले आहे. युनायटेड किंगडमच्या ‘ऑफकॉम’च्या एका अहवालानुसार, ब्रिटनच्या ९१ टक्के मुलांकडे वयाच्या ११ व्या वर्षीच स्वतःचा ‘स्मार्टफोन’ असतो. जेव्हा ही मुले १९ वर्षांची होतात, तोपर्यंत त्यांच्यातील ६५ टक्के मुले नैराश्याचे बळी ठरलेली असतात.

१. या अहवालानुसार १९ युरोपीय देशांमध्ये १३ वर्षांखालील ८० टक्के मुले प्रतिदिन इंटरनेट वापरतात. वयाच्या १९ व्या वर्षी ९० टक्के किशोरवयीन मुलांकडे स्वतःचा स्मार्टफोन असतो.

२. केंब्रिज विद्यापिठाचे प्रा. एमी ऑर्बन सांगतात की, अगदी ८ वर्षांपर्यंतची मुलेही सामाजिक माध्यमांवर स्वत:चे खाते उघडतात. त्यांचा ऑनलाइन दुरुपयोग होण्याची शक्यता अधिक असते.

३. ऑर्बन यांच्या मते, ‘स्मार्टफोन’ आणि सामाजिक माध्यमे यांच्या वापरामध्ये समतोल राखणे महत्त्वाचे आहे. १ सहस्र ७०० मुलांवर केलेल्या संशोधनात त्यांना असे आढळून आले की, ११ ते १३ वर्षांच्या मुली आणि १४-१५ वर्षांची मुले जी सामाजिक माध्यमे वापरण्यास आरंभ करतात, ती पुढे आयुष्यात अल्प समाधानी असतात. दुसरीकडे ज्यांनी सामाजिक माध्यमांचा वापर केला नाही, ती अधिक समाधानी असल्याचे दिसून आले.

स्मार्टफोन आवश्यक, पण पालकांचे नियंत्रण हवे ! – प्रा. सोनिया लिव्हिंगस्टोन

‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’च्या प्रा. सोनिया लिव्हिंगस्टोन सांगतात, या काळात आपल्या मुलांसाठी इंटरनेट आणि स्मार्टफोन आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना समाजाशी नव्याने जोडता येते. अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेता येतात; पण त्यावर पालकांचे नियंत्रण असणे महत्त्वाचे आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘स्मार्टफोन’ आणि सामाजिक माध्यमे यांचा वापर करणारी मुले अल्प समाधानी !
  • वैज्ञानिक उपकरणांचा अतिवापर केल्याचाच हा दुष्परिणाम ! अध्यात्मविहीन विज्ञानाचे उदात्तीकरण हेच या सर्व समस्यांना कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !