आफ्रिकेतील नामिबियन चित्त्यांना आज भारतात आणण्यात येणार !

पंतप्रधानांच्या हस्ते मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार !

नवी देहली – मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ८ चित्त्यांना आणण्यासाठी नामिबियाची राजधानी विंडहोक येथे विशेष विमान गेले असून त्यांना १७ सप्टेंबरला भारतात आणण्यात येणार आहे. केंद्रशासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या वाढदिनी त्यांच्याच हस्ते  चित्त्यांना उद्यानात सोडण्यात येईल.

या चित्त्यांमध्ये ५ नर आणि ३ मादी आहेत. या चित्त्यांना आरंभी खुल्या पिंजर्‍यात सोडण्यात येणार आहे. स्थानिक वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आधी नर चित्त्यांना जंगलात सोडले जाईल. दक्षिण आफ्रिकेने चित्त्यांचे इतर देशांमध्ये स्थलांतर केले आहे; पण भारतात हे प्राणी पहिल्यांदाच पाठवले जात आहेत.