हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘नेतृत्व विकास शिबिरा’मध्ये ध्वनीयंत्रणेच्या संदर्भात आलेले अडथळे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या उपायांमुळे दूर करता येणे

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे २० ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नेतृत्व विकास शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना आध्यात्मिक स्तरावरील उपाय विचारण्यात आले होते. हे उपाय शिबिर चालू होण्याच्या एक दिवस आधीपासूनच आरंभ करण्यात आले. तरीही शिबिरामध्ये ध्वनीयंत्रणेच्या संदर्भात अडथळे आले. त्या अडथळ्यांवर सद्गुरु गाडगीळकाकांनी दिलेल्या उपायांमुळे कशी मात करता आली, याचा आढावा येथे देण्यात आला आहे.

विकारांवर ध्यानातून नामजप शोधतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. ‘नेतृत्व विकास शिबिरा’त अडथळे येऊ नयेत म्हणून आधीच करण्यात आलेले उपाय

१ अ. जप : महाशून्य

१ आ. न्यास : उजव्या हाताचा तळवा ओठांसमोर १ – २ सेंटीमीटर अंतरावर धरणे

१ इ. कालावधी : प्रतिदिन २ घंटे

हे उपाय जिल्ह्यातील ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेले साधक श्री. अनंत परुळेकर, देवगड आणि श्रीमती सरिता प्रभु, शिरोडा यांनी शिबिराला आरंभ होण्याच्या १ दिवस आधीपासून ते शिबिराच्या कालावधीत प्रत्येकी १ घंटा केले.

सौ. माधुरी नितीन ढवण

२. उपाय करूनही शिबिरात आलेले अडथळे आणि त्यांवर आध्यात्मिक उपायांद्वारे केलेली मात

२ अ. शिबिराचा पहिला दिवस

२०.८.२०२२ या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून कुडाळ येथील ‘हॉटेल कोकण स्पाईस’ येथे हिंदु जनजागृती समितीने आयाजित केलेल्या ‘नेतृत्व विकास शिबिरा’ला आरंभ होणार होता. शिबिराची सगळी सिद्धता पूर्ण झाली होती. आधी झालेल्या शिबिरांमध्ये आलेले अडथळे लक्षात घेऊन या शिबिरासाठी चांगल्या प्रकारची ध्वनीयंत्रणा (साऊंड सिस्टीम) आणि ६ माईक ठेवण्यात आले होते.

२ अ १. चांगल्या प्रकारची ध्वनीयंत्रणा असूनही आणि ती आधी तपासून पाहिली असूनही शिबिराला आरंभ होताच माईक खरखरू लागणे, त्यांतून कर्कश आवाज येणे अन् ६ पैकी ५ माईक बंद पडणे : सकाळी १० वाजता शिबिराला आरंभ झाल्यावर काही सेकंदांतच माईक खरखरू लागले, काही माईक बंद पडले आणि काही माईकमधून ‘कूऽऽई’, असा आवाज येणे चालू झाले. बराच वेळ केवळ एकच माईक कसाबसा चालू होता. ही सर्व ध्वनीयंत्रणा दोन वेळा तपासून घेतली होती, तरीही या अडचणी येत होत्या. त्यानंतर काही वेळ एकाच माईकवर शिबिर घेणे चालू होते. दुपारपर्यंत अशीच स्थिती होती.

२ अ २. कुणी सिगारेट ओढत नसूनही कार्यक्रम स्थळाच्या प्रवेशद्वारावर सिगारेटचा वास येऊ लागणे : जेव्हा ध्वनीयंत्रणेमध्ये अडथळे येण्याला आरंभ झाला, त्याच वेळी कार्यक्रम स्थळाच्या प्रवेशद्वारावर सिगारेटचा वास येऊ लागला. हा वास खूप तीव्र होता. शिबिर ‘हॉटेल’मध्ये असल्याने यासंदर्भात आजूबाजूला पाहून निश्चितीही केली; पण तिथे कुणीही सिगारेट ओढत नव्हते. तेव्हा लगेच आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणार्‍या साधकाला हा त्रास दूर होण्यासाठी प्रार्थना करायला सांगितली, तसेच सद्गुरु सत्यवानदादांना यावर उपाय विचारले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवेशद्वारावर विभूती फुंकरली.

२ अ ३. दुपारच्या महाप्रसादाच्या वेळी आम्हाला समजले की, सद्गुरु सत्यवानदादांना कार्यक्रम स्थळी एक वाईट शक्ती फिरत असल्याचे सूक्ष्मातून दिसत होते.

२ अ ४. एका कार्यकर्त्याच्या वाहनाला अपघात होणे, त्याचा पाय पुष्कळ सुजणे; पण गुरुकृपेने त्याला कुठलीही मोठी दुखापत झालेली नसणे आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय अन् औषधोपचार यांनी तो काही वेळाने चालू शकणे : याच दरम्यान श्री. रमाकांत सोन्सुरकर यांच्या वाहनाला अपघात झाल्याचे कळले. त्यांचा दुखापत झालेला पाय इतका सुजला होता की, ‘त्यांच्या पायाचे हाड तुटले असेल’, असे वाटत होते; पण सद्गुरु सत्यवानदादांनी दिलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि गुरुदेवांची कृपा यांमुळे त्यांना कुठलीही मोठी दुखापत झाली नव्हती. डॉक्टरांनी तपासून औषध दिल्यावर काही वेळातच ते बर्‍यापैकी चालू लागले.

२ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे : दुपारी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना शिबिरात येत असलेले अडथळे सांगितले. यावर त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले. तसेच सद्गुरु सत्यवानदादांनी सांगितलेला मधे मधे विभूती फुंकरण्याचा उपायसुद्धा चालू होता.

अशा प्रकारे अडथळ्यांना सामोरे जात कार्यशाळेचा पहिला दिवस संपला.

३. शिबिराच्या दुसर्‍या दिवशी आलेल्या अडचणी आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय

३ अ. शिबिराला आरंभ झाल्यावर माईकमध्ये येत असलेला अडथळा सद्गुरु गाडगीळकाकांना सांगितल्यावर त्यांनी व्यासपिठाच्या डावीकडे असलेल्या ध्वनीयंत्रणेवर त्रासदायक शक्तीचा दाब असल्याचे अचूक ओळखणे आणि त्यावर उपाय सांगणे : दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजता शिबिराला आरंभ झाल्याबरोबर माईकमधून कर्कश आवाज येणे चालू झाले. सकाळी ११.३० वाजता सद्गुरु गाडगीळकाकांना हा अडथळा सांगितल्यावर त्यांनी सूक्ष्मातून जाणून विचारले, ‘‘व्यासपिठावरील वक्त्यांच्या डाव्या बाजूला त्रासदायक शक्तीचा दाब जाणवतो. तेथे ध्वनीयंत्रणा मांडली आहे का ?’’ खरोखर तेथूनच शिबिरातील ध्वनीयंत्रणेचे संचलन केले जात होते. हे त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘याचा अर्थ ध्वनीयंत्रणेवर वाईट शक्तींनी निर्माण केलेल्या त्रासदायक शक्तीच्या दाबामुळेच माईक बंद पडणे, माईकमधून कर्कश आवाज येणे इत्यादी त्रास होत आहेत. ते दूर करण्यासाठी लिंबाने त्या ध्वनीयंत्रणेची दृष्ट काढा.’’

३ आ. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितल्याप्रमाणे ध्वनीयंत्रणेची लिंबाने दृष्ट काढणे इत्यादी आध्यात्मिक उपाय केल्यावर ५ मिनिटांत ध्वनीयंत्रणा व्यवस्थित चालू होणे आणि त्यानंतर तिच्यामध्ये कुठलाही अडथळा न येणे : सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितल्याप्रमाणे श्री. विनोद गादीकर यांनी त्या ध्वनीयंत्रणेची लिंबाने दृष्ट काढली आणि त्यानंतर तेथे विभूती फुंकरली. ध्वनीयंत्रणेजवळ सकाळी आध्यात्मिक उपायांसाठी एक लिंबू ठेवले होते. आम्ही ते लिंबू विसर्जित करून तिथे नवीन लिंबू ठेवले. त्यानंतर ५ मिनिटांतच ध्वनीयंत्रणा व्यवस्थित चालू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुठलाही अडथळा न येता शिबिराचा दुसरा दिवस व्यवस्थित पार पडला.

४. शिबिराचा शेवटचा दिवस निर्विघ्नपणे पार पडणे आणि त्या दिवशी शिबिरामध्ये चैतन्य जाणवणे

शिबिराचा तिसरा, म्हणजे शेवटचा दिवसही निर्विघ्नपणे पार पडला. त्या दिवशी शिबिरामध्ये पुष्कळ चैतन्य जाणवत होते, तसेच तेथील वातावरण प्रकाशमान झाल्याचेही जाणवत होते. तिथे गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते.

गुरुदेवांच्या कृपेने हे अनुभवता आले. त्यामुळे त्यांच्याप्रती खूप कृतज्ञता वाटली. त्यांच्या कृपेनेच सद्गुरूंचे आध्यात्मिक उपायांविषयी मार्गदर्शन मिळाले आणि अडथळे दूर होऊन निर्विघ्नपणे सेवा करता आली. हे सर्व अनुभवतांना भाव जागृत झाला आणि गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. गुरुदेव, केवळ तुमच्या कृपेने जे अनुभवायला मिळाले, ते शब्दातही तुम्हीच लिहून घेतलेत, याबद्दल कोटी कोटी कृतज्ञता !’

– सौ. माधुरी ढवण, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (२९.८.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक