परीक्षेत ‘शून्य’ गुण मिळाल्याविषयी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाकडे तक्रार !

पुणे – उत्तरपत्रिका योग्य पद्धतीने लिहूनही काही विषयांमध्ये बहुतांश विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ‘एल्.एल्.बी.’च्या ‘लँड लॉ २’ या विषयामध्ये सर्वाधिक, तर त्या खालोखाल ‘बी.ए.एल्.एल्.बी.’च्या ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ’, ‘कंपनी लॉ’ या विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांना १५ पेक्षा अल्प गुण प्राप्त झाले आहेत. एकवेळ अल्प गुण समजू शकतो; परंतु पुरवणी लावूनही शून्य गुण कसे मिळाले ? असा प्रश्न उपस्थित करत नगरच्या न्यू विधी महाविद्यालय, पिंपरी येथील डॉ. डी.वाय. पाटील आणि इतर संलग्न विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाकडे निवेदन दिले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ‘एल्.एल्.बी.’ आणि ‘बी.ए.एल्.एल्.बी.’ या परीक्षांचे निकाल घोषित झाले असून त्यामध्ये अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यावर विद्यार्थ्यांचे म्हणणे असे आहे की, पेपर पूर्णपणे आणि व्यवस्थित पद्धतीने लिहूनही चूक नसतांना अनुत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांच्या निकालाविषयी विद्यापिठाकडून चौकशी व्हावी आणि नक्की कोणत्या कारणाने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत ? याचा खुलासा करावा.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, ‘‘परीक्षा विभागाने घोषित केलेल्या निकालामध्ये संयुक्त उत्तीर्णता ६६ आणि ८५ टक्के अशी वाढ झाल्याचे दिसून येते. निकालाची टक्केवारी ही निश्चितपणे समाधानकारक असल्याने पुनर्परीक्षेचा प्रश्न येत नाही. काही  विषयांमध्ये अनुत्तीर्ण आणि शून्य गुण मिळण्याचे प्रमाण अधिक असल्याने पुनर्मूल्यांकन करून घेण्याविषयी परीक्षा विभाग सकारात्मक आहे.’’

संपादकीय भूमिका 

पेपर लिहूनही विद्यार्थ्यांना शून्य गुण कसे काय दिले गेले ? याचे अन्वेषण लवकर होऊन विद्यार्थ्यांवरील ताण अल्प करणे आवश्यक आहे !