गोव्यात राजकीय भूकंप : काँग्रेसचे ८ आमदार भाजपमध्ये !

  • विधानसभेत विरोधी पक्षनेताच नसणार, यामुळे काँग्रेसला नामुष्की !

  • ‘काँग्रेस छोडो, भाजप जोडो’ मोहिमेला प्रारंभ झाल्याची चर्चा !

पणजी – गोव्यातील राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोव्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसांतच काँग्रेसमधील काही आमदारांनी बंड पुकारून भाजपमध्ये जाण्याची सिद्धता केली होती; परंतु पक्षांतरविरोधी कायद्यानुसार आवश्यक असलेली एकूण सदस्यांच्या दोन तृतीयांश ही संख्या भरत नसल्याने अगदी शेवटच्या क्षणी पक्षांतर करणे या बंडखोरांना शक्य झाले नव्हते.

१. १४ सप्टेंबरला सकाळी काँग्रेसचे ८ आमदार मायकल लोबो, डिलायला लोबो, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, आलेक्स सिक्वेरा आणि केदार नाईक हे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा संकुलात पोचले. या ठिकाणी पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला होता.

२. या आमदारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर या गटाने भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला.

३. गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी याची औपचारिक घोषणा केली. यासमवेतच भाजपच्या पक्ष कार्यालयात आठही आमदारांचे स्वागत करण्यात आले.

४. या पक्षांतरामुळे गोव्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेताच नसणार, अशी माहिती गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी दिली आहे. तवडकर सध्या देहलीत आहेत.

५. याआधी ३ वर्षांपूर्वी काँग्रेसचे १० आमदार फुटून भाजमध्ये गेले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या आमदारांना चर्च आणि मंदिर येथे नेऊन पक्षांतर न करण्याची शपथ देण्यात आली होती. तरीही हे पक्षांतर झालेच !

६. याविषयी स्पष्टीकरण देतांना माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले, ‘‘मी देवावर विश्‍वास ठेवतो. मी आताही देवाचे दर्शन घेतले आणि त्याला परिस्थितीची कल्पना देऊन ‘काय करू ?’, असे विचारले. देवाने परिस्थितीनुसार निर्णय घेण्यास सांगितले.’’

७. विरोधी पक्षनेते असलेले मायकल लोबो म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.’’

८. देशभरात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ‘भारत जोडो’ आंदोलन करत असतांना गोव्यातून ‘काँग्रेस छोडो, भाजप जोडो’ मोहिमेला प्रारंभ झाला आहे, अशी राजकीय क्षेत्रात चर्चा आहे.