ज्ञानवापीचा खटला पुढेही चालू रहाणार !

  • वाराणसी जिल्हा न्यायालयाचा हिंदूंच्या बाजूने निर्णय !

  • निर्णयाला मुसलमान पक्ष उच्च न्यायालयात आव्हान देणार

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी आणि शृंगार गौरी येथे पूजा करण्याच्या संदर्भातील याचिकेवर मुसलमान पक्षाने आक्षेप घेतल्यानंतर हा खटला चालवण्यात यावा कि नाही, यावर जिल्हा न्यायालयाने निर्णय दिला.  १२ सप्टेंबर या दिवशी ‘हा खटला चालवण्यास योग्य आहे’, असा आदेश न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे, ‘ज्ञानवापी आणि शृंगार गौर येथे पूर्वीपासून पूजा केली जात असल्याने येथे धार्मिक पूजा स्थळ कायदा १९९१ लागू होत नाही. तसेच ही वक्फ बोर्डाचीही संपत्ती नाही. त्यामुळे यावर सुनावणी केली जाऊ शकते.’ जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्‍वेश यांनी हा निर्णय दिला. यावर आता २२ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. हिंदूंच्या बाजूने निर्णय लागल्यानंतर मुसलमानांकडून ‘याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार’, असे सांगितले जात आहे.

१. हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सांगितले की, न्यायालयाच्या या निर्णयामुळे पूजा करण्याच्या मागणीसह न्यायालय आयुक्तांच्या ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाच्या अहवालावरही आता सुनावणी केली जाईल.

२. अधिवक्ता पू. हरि शंकर जैन म्हणाले की, हा मोठा विजय आहे. आता भव्य शिवमंदिर बांधण्याचा एक मार्ग मोकळा झाला आहे. आजच्या प्रमाणेच पुढील लढाईही आम्ही जिंकू.

३. याचिकाकर्ता रेखा पाठक म्हणाल्या की, आज आम्ही इतिहास रचला आहे. या निर्णयामुळे वाराणसीमध्ये ‘हर हर महादेव’च्या घोषणा ऐकू शकता.

४. याचिकाकर्ता सोहन लाल आर्य यांनी म्हटले की, हा हिंदु पक्षाचा विजय आहे. हा निर्णय ज्ञानवापी मंदिराची आधारशिला आहे. आम्ही लोकांना शांतता ठेवण्याचे आवाहन करत आहोत.

५. विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, हा निर्णय येणारच होता; मात्र तो लांबण्याचा प्रयत्न मुसलमान पक्षाकडून केला जात होता.

६. अतिसंवेदनशील समजल्या जाणार्‍या या खटल्याच्या प्रकरणी न्यायालयाचा आदेश पहाता आजूबाजूच्या परिसरात कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काय आहे खटला ?

१८ ऑगस्ट २०२१ या दिवशी ५ हिंदु महिलांनी ज्ञानवापी परिसरातील शृंगार गौरीची प्रतिदिन पूजा करण्याची अनुमती मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. सध्या येथे वर्षातून एकदाच पूजा होते. या ५ याचिकाकर्त्यांचे नेतृत्व दिल्लीतील राखी सिंह करत आहेत. अन्य चार सीता साहू, मंजू व्यास, लक्ष्मी देवी आणि काशीच्या रेखा पाठक आहेत. २६ एप्रिल २०२२ या दिवशी वाराणसी दिवाणी न्यायालयाने ज्ञानवापी परिसर, तसेच शृंगार गौरी आणि इतर देवतांच्या पडताळणीसाठी चित्रीकरण अन् सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर ते करण्यात आले. यात तेथे शिंवलिंग सापडले. मुसलमानांनी या एकूणच खटल्याला विरोध करत तो धार्मिक पूजा स्थळ कायदा १९९१ नुसार चुकीचा असल्याचे सांगितले होते. त्यावर जिल्हा न्यायालयाने १२ सप्टेंबरला आदेश देत धार्मिक पूजा स्थळ कायदा १९९१ येथे लागू होत नसल्याचे स्पष्ट करत खटला चालवण्यास अनुमती दिली आहे.