बंगालमध्ये भाजपच्या मोर्च्यावर देशी बाँबने आक्रमण : स्फोटात २ कार्यकर्ते घायाळ

कोलकाता – बंगालमधील सीतलकुची येथे ११ सप्टेंबर या दिवशी भाजपच्या निषेध मोर्च्यावर देशी बाँब फेकण्यात आले. त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी झालेल्या स्फोटात भाजपचे २ कार्यकर्ते घायाळ झाले. हा मोर्चा तृणमूल काँग्रेस नेत्यांच्या विविध घोटाळ्यांच्या निषेधार्थ काढण्यात आला होता, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष सुकुमार रॉय यांनी सांगितले. ‘या मोर्च्यावर केवळ देशी बाँबच फेकले गेले नाहीत, तर दगडफेकही करण्यात आली’, असे रॉय यांनी सांगितले. हे आक्रमण तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपने केला, तर तृणमूल काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला.

बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून ‘ईडी’ने विविध लोकांच्या निवासस्थानांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि अन्य बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या छाप्यात अनेक प्रसिद्ध उद्योगपतींसह अभिनेता आमिर खान याचेही नाव आहे. याशिवाय शिक्षक भरती घोटाळा, गोवंश तस्करी, कोळसा तस्करी यांमध्ये राज्यातील अनेक दिग्गज राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे. (अशा अवैध धंद्यात गुतलेल्या भ्रष्ट व्यक्तींच्या विरोधात केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी, अशी राष्ट्रभक्त नागरिकांची अपेक्षा आहे ! – संपादक)    

संपादकीय भूमिका

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल ‘बाँब बनवण्याचा कारखाना’ बनला आहे. तेथील कायदा आणि सुव्यस्थेचे तीन तेरा वाजल्याने आता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे अपरिहार्य !