एक दिवस माझ्या बळीराजासाठी !

राज्यामध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही समस्या ऐरणीवर आली आहे. काही झाले तरी आत्महत्या थांबत नाहीत. यासाठी सुलभ आणि प्रभावी कृषीविषयक धोरण सिद्ध करण्यासाठी शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी अन् प्रश्न प्रशासनाने समजून घेणे, तसेच त्यांवर उपाययोजना काढून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासकीय अधिकारी संपूर्ण एक दिवस शेतकर्‍यांसमवेत व्यतीत करून शेतकर्‍यांच्या समस्यांच्या मुळापर्यंत जाणार आहेत. त्यासाठीच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यभर राबवण्याची संकल्पना मांडली आहे. या उपक्रमांतर्गत प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, तसेच विद्यापिठाचे शास्त्रज्ञ सकाळपासून सायंकाळपर्यंत एक दिवस शेतकर्‍यांसमवेत प्रत्यक्ष शेतावर आणि ग्रामीण भागात रहाणार आहेत. त्यांच्या दैनंदिन शेतीच्या कामकाजात येणार्‍या अडचणींवर चर्चा करणार आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मांडलेली कल्पना अत्यंत चांगली आहे, असे म्हणता येईल; परंतु शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी आणि त्यातून शेतकरी निवडत असलेला आत्महत्येचा पर्याय विचारात घेतल्यास शेतकर्‍याचे मनोबल उंचावण्याच्या दृष्टीनेही विचार व्हायला हवा.

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे उपरोक्त उपक्रमाच्या कार्यवाहीसाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथे गेले होते. त्याच दिवशी त्यांच्या मुक्काम स्थळापासून ५ किलोमीटरवर असलेल्या लाकटू गावात एका शेतकरीपुत्राने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. या प्रसंगातून शेतकर्‍याला त्याच्या समस्या सुटतील, असे वाटत नाही, असे वाटते. दुष्काळ, गारपीट, बेमोसमी पाऊस, वादळ, ढगफुटीसदृश पाऊस यांसारख्या अनेक संकटांना तोंड देत शेतकरी जीवन कंठत आहेत. आतापर्यंत अनेक सरकारे आली आणि गेली. अनेकांनी ‘शेतकरी’ केंद्रस्थानी ठेवून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेतली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

खरेतर शेतकर्‍यांचे नैराश्य घालवण्यासाठी अन्य समस्यांसमवेत शेतकर्‍यांना येणार्‍या समस्येला खंबीरपणे तोंड देण्यासाठी सिद्ध करणे आवश्यक आहे. मनोबल वाढण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देऊन साधना शिकवणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमासमवेत शेतकर्‍यांच्या मनावर आध्यात्मिक साधनेचे महत्त्व अंकित करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव