श्री गणेशमूर्तीची स्थापना करणार्‍या रूबी खान यांच्याकडून मूर्तीचे उत्साहात विसर्जन !

मूर्तीच्या स्थापना केल्याने ठार मारण्याच्या मिळाल्या होत्या धमक्या !

श्री गणेशमूर्तीचे विधीवत् विसर्जन करताना मुसलमान महिला रूबी खान

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील मुसलमान महिला रूबी खान यांनी त्यांच्या घरी श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने स्थापन केलेल्या श्री गणेशमूर्तीचे विधीवत् विसर्जन केले. मूर्तीची स्थापना केल्याने त्यांच्या विरोधात मौलानांनी (इस्लामी अभ्यासकांनी) फतवा काढला होता. तरीही रूबी खान यांनी माघार न घेता श्री गणेशाची पूजा चालू ठेवली होती. रूबी खान यांच्या सुरक्षेसाठी २ पोलिसांना नियुक्त करण्यात आले आहे.

रूबी खान यांनी सांगितले की, मी मूर्तीची स्थापना केल्याने मला इस्लाममधून बहिष्कृत करण्याच्या आणि माझ्या कुटुंबाला जिवंत जाळण्याच्या धमक्या मिळत होत्या. घराबाहेर पडल्यावर, ‘मी हिंदु महिला रस्त्यावरून चालली आहे’, असे टोमणे मारले जात होते. मला फतव्यांची भीती वाटत नाही. मी उत्साहाने श्री गणेशमूर्तीची स्थापना केली आणि त्याच उत्साहात विसर्जन करत आहे.

संपादकीय भूमिका

एखाद्या मुसलमानाने हिंदूंच्या धार्मिक कृती केल्या, तर लगेच धर्मांध त्याचा विरोध करतात आणि ठार मारण्याची धमकी देतात, याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !