पणजी, ७ सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यातील पोलिसांनी ३ प्रमुख अमली पदार्थ व्यावसायिकांना अटक केली असून यामुळे अमली पदार्थांच्या व्यापाराला आळा बसेल. राज्य सरकारने अमली पदार्थ व्यावसायिकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम चालू केली आहे. ‘गोवा राज्य अमली पदार्थ सेवनासाठी नाही’, असा कडक संदेश सरकार पर्यटकांना देऊ इच्छिते, असे प्रतिपादन ७ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पोलीस खात्यातील अधिकार्यांसमवेत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केलेले ३ व्यावसायिक गोव्यातील प्रमुख अमली पदार्थ व्यावसायिक आहेत. नाईट क्लब आणि रात्रीच्या मेजवान्या होणार्या इतर ठिकाणांवर पोलीस खात्याचे लक्ष आहे. जर एखाद्याच्या जागेत अमली पदार्थ सापडले, तर त्या जागेच्या मालकालाही अटक करण्यात येईल. सोनाली फोगाट यांना बलपूर्वक अमली पदार्थ देण्यात आलेल्या हणजुणे येथील कर्लिस उपाहारगृहाला सरकारी अधिकार्यांनी टाळे ठोकले आहे.’’
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत गोव्यात गुन्हे होण्याचे प्रमाण अल्प !
गोव्यात हत्या होण्याचे प्रकार वाढले आहेत का ? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘वर्ष २०१९ पासून आतापर्यंत गुन्ह्यांचे प्रमाण अल्प झाले असून गुन्ह्यांचे अन्वेषण करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या २ वर्षांत अनेक लोकांनी गोव्याबाहेर स्थलांतर केले होते; परंतु आता गोव्यातील आर्थिक व्यवहार सुरळीत झाल्याने ते आता गोव्यात परतत आहेत. गोवा राज्याच्या बाहेरील अनेक लोक येथील गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत.
बलात्काराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी महिला हवालदारांकडून युवतींमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न
बलात्काराच्या प्रकरणांपैकी ९५ टक्के प्रकरणांमध्ये गुन्हेगार हा पीडित व्यक्तीच्या ओळखीचा असतो. महिला हवालदारांना त्यांच्या भागातील तरुणींना भेटून अशा प्रकारच्या घटनांपासून कसे सुरक्षित रहावे, याविषयी प्रबोधन करण्याविषयी सूचना दिल्या आहेत.