पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत प्रतिदिन १ सहस्र १०० टन कचर्‍याची निर्मिती !

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटी अशी वाटचाल चालू असणार्‍या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या २५ लाखांच्या घरात आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन १ सहस्र १०० टन कचर्‍याची निर्मिती होत आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील घराघरांतील कचरा महापालिकेच्या ४२१ वाहनांमधून गोळा करून तो संकलन केंद्रापर्यंत वाहून नेण्यात येतो.

उद्योगनगरीत प्रतिदिन निर्माण होणार्‍या घनकचर्‍याचे योग्य रितीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे ८१ एकर इतकी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मोशी कचरा डेपोमध्ये कचर्‍याचे वर्गीकरण करून त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रीया केली जाते. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घरोघरचा कचरा गोळा करणे, मोशी कचरा डेपोपर्यंत त्याची वाहतूक करणे, त्याची विल्हेवाट लावणे यांसह सार्वजनिक रस्त्यांची दैनंदिन साफसफाई करणे, उघडी गटारे, तसेच नाले यांची स्वच्छता करणे आदी कामांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

कचरा अल्प करणे आणि कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे यांविषयी नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे, तसेच प्रशासनाने ओल्या कचर्‍याचा उपयोग करून नैसर्गिक खते सिद्ध करण्यासाठीही नागरिकांना प्रशिक्षित करणे आवश्यक !