चारचाकी गाडीमध्ये मागील सीटवर बसणार्‍यांनाही आता सीट बेल्ट अनिवार्य !  

नवी देहली – टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर चारचाकी गाडीमध्ये मागील सीटवर बसणार्‍या प्रवाशांना ‘सीट बेल्ट’ अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासाठी ‘सीट बेल्ट’ लावण्याविषयी सतर्क करणारी प्रणालीदेखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणार्‍या प्रवाशांना दंड ठोठावला जाणार आहे. या आदेशाची येत्या ३ दिवसांमध्ये कार्यवाही केली जाणार आहे, असे ट्वीट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर तज्ञ आणि टीकाकार यांनी वाहतूक सुरक्षेच्या संदर्भातील नियमांकडे लक्ष वेधले होते. मागच्या सीटवर बसलेल्या मिस्त्री यांनी सीट बेल्ट न बांधल्याने या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.