तब्बल ५ सहस्र चारचाकी वाहने चोरणार्‍या अनिल चौहानला अटक !

  • गेल्या २७ वर्षांत अनेक टॅक्सीचालकांची केली हत्या !

  • अनेक वेळा अटक आणि सुटका !

चारचाकी चोर अनिल चौहान (मध्यभागी)

नवी देहली – देहली पोलिसांनी ५ सप्टेंबर या दिवशी अनिल चौहान नामक देशातील सर्वांत मोठ्या चारचाकी चोराला अटक केली. त्याच्यावर तब्बल ५ सहस्र चारचाकी गाड्या चोरल्याचा आरोप आहे. गेल्या २७ वर्षांत त्याने अनेक टॅक्सीचालकांची हत्याही केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५२ वर्षीय अनिलने चोरीच्या पैशांतून देहली, मुंबई आणि ईशान्य भारतात अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्याला ३ पत्नी आणि ७ मुले आहेत.

१. सेंट्रल देहली पोलिसांच्या विशेष अधिकार्‍यांनी अटकेच्या केलेल्या कारवाईत अनिलकडून ६ पिस्तुले आणि ७ काडतुसे जप्त केली.

२. देहलीच्या खानपूर भागात रहाणारा अनिल रिक्शा चालवण्याचे काम करत होता. वर्ष १९९५ नंतर त्याने चारचाकी चोरण्यास आरंभ केला. २७ वर्षांत त्याने सर्वाधिक ‘मारुती’ आस्थापनाच्या ८०० गाड्या चोरल्या.

३. तो देशाच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन चारचाकी गाड्या चोरत असे आणि त्या नेपाळ, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येतील राज्यांत विक्री करत असे.

४. त्याने आसाममधील सरकारी कंत्राटदार म्हणूनही काम केले. तो तेथील स्थानिक नेत्यांच्या संपर्कातही होता.

५. पोलिसांनी अनिलला आतापर्यंत अनेकदा अटक केली आहे. वर्ष २०१५ मध्ये त्याला काँग्रेसच्या एका आमदारासमवेत अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याला ५ वर्षांची शिक्षा झाली होती. वर्ष २०२० मध्ये त्याची सुटका झाली. त्याच्या विरोधात तब्बल १८० गुन्हे नोंद आहेत.

प्रतिबंधित सघटनांना शस्त्रास्त्रे पुरवल्याचाही आरोप !

पोलिसांच्या माहितीनुसार अनिल चौहानचा शस्त्रास्त्रांच्या तस्करीतही हात आहे. त्याच्यावर उत्तरप्रदेशातून शस्त्रे घेऊन ईशान्येतील प्रतिबंधित सघटनांना पुरवल्याचाही आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) त्याच्या विरोधात ‘मनी लाँड्रिंग’चाही (काळा पैसा पांढरा करण्याचाही) गुन्हा नोंदवला होता.

संपादकीय भूमिका

  • एवढा अट्टल गुन्हेगार असतांना अटक केल्यावर त्याला का सोडण्यात आले ? यातून ‘चौहान याने पोलिसांशी संगनमत करून एवढ्या हत्या आणि असंख्य चोर्‍या केल्या का, याचे अन्वेषणही व्हायला हवे’, अशी मागणी कुणी केल्यास त्यात चूक ते काय ?
  • अशा गुन्हेगाराला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. अशा गुन्हेगारांवर कारवाई न झाल्यानेच देशातील गुन्हेगारी थांबत नाही. यातून ‘छोटे गुन्हे केले, तरी आपल्याला काहीच होणार नाही’, अशी मानसिकता समाजात रुढ झाली आहे. ‘यासाठी सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी असणे, ही अतिशयोक्ती नाही’, असे म्हणावे लागणे, हे देशाचे दुर्दैव !