पालघर येथे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू !

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री

मुंबई – टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची भरधाव वेगातील कार पालघरमधील चारोटी येथे नदीवरील पुलाच्या कठड्याला आदळली. या अपघातात मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली. सायरस मिस्त्री हे वर्ष २०१२ ते वर्ष २०१६ या काळात टाटा उद्योग समुहाच्या अध्यक्षपदी होते. सुशासन आणि पारदर्शी व्यवस्थापन यांचा आग्रह धरणार्‍या मिस्त्री यांनी टाटा समुहावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर वर्ष २०१६ मध्ये त्यांना ‘टाटा सन्स’च्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले होते. सध्या ते शापूरजी पालोनजी समुहाचे संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) होते. ४ सप्टेबर या दिवशी दुपारी सव्वातीन वाजता मिस्त्री कर्णावतीहून मुंबईला येत होते. त्या वेळी त्यांच्या कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती नदीवरील पुलाच्या कठड्याला जोरात आदळली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य २ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.