सोलापूर – मुंबई-सोलापूर या मार्गावर धावणार्या ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवर २ जानेवारीला रात्री ९.३० वाजता जेऊर-कुर्डूवाडी भागातील भाळवणी स्थानकाजवळ अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. यात कोच क्रमांक ‘सी -११’ मधील आसन क्रमांक २ आणि ३ च्या खिडकीच्या काचा फुटल्या. या घटनेत प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा बलाने पहारा वाढवला आहे. मध्य रेल्वेच्या वतीने १० फेब्रुवारी २०२४ ला पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर ‘वन्दे भारत’ एक्सप्रेस चालू करण्यात आल्या आहेत. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (रेल्वे असुरक्षित असणे दुर्दैवी ! – संपादक)
गत काही दिवसांपासून रेल्वे रूळावर दगड ठेवणे, गॅस टाकी ठेवणे, यांसह रेल्वेचे अपघात घडवण्यासाठी समाजकंटक वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या दगडफेकीच्या मागे कोण आहे ? याचा शोध पोलिसांनी तात्काळ घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.