गायनस्पर्धेसाठी येणार्‍या स्पर्धकांना त्यांच्या कलासाधनेला योग्य दिशादर्शन करू न शकणारे परीक्षक नेमणार्‍या विविध वाहिन्यांवरील गायनस्पर्धा !

‘अलीकडे दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर संगीत आणि नृत्य यांच्या स्पर्धात्मक कार्यक्रमांची लाट आली आहे. ते पहातांना लक्षात आलेल्या आयोजकांच्या त्रुटी येथे दिल्या आहेत.

सौ. भक्ती कुलकर्णी

१. एका कार्यक्रमात ५ जणांना चांगले गायक म्हणून निवडल्यावर काही वर्षांतच त्यांना पुढच्या गायनाच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बोलावले जाणे

काही वर्षांपूर्वी एका वाहिनीवर एक गायनाची स्पर्धा झाली. त्यात ५ स्पर्धक ‘चांगले गायक’ म्हणून निवडण्यात आले. या गायकांना काही वर्षांत चांगली प्रसिद्धी मिळाली अन् अजूनही मिळत आहे. याच सुमारास नवीन चालू होणार्‍या एका गायनाच्या स्पर्धेचे विज्ञापन पाहिले. त्यात याच ५ जणांना स्पर्धेचे ‘परीक्षक’ म्हणून नेमण्यात आले होते.

२. ‘ज्यांचे गायनाचे शिक्षण पूर्ण झालेले नाही’, ते इतरांच्या गायनाचे परीक्षण करून त्यांना योग्य दिशा देऊ शकत नसणे

ते विज्ञापन वाचून माझ्या मनात विचार आला, ‘आता कुठे हे ५ जण स्पर्धेत निवडून आले आहेत. काही वर्षांतच त्यांना ‘परीक्षक’ म्हणून कसे नेमले ? हे स्पर्धक स्पर्धेतून निवडून आले असले, तरी त्यांनी अजून संगीताचे पूर्ण ज्ञान घेतलेले नाही. त्यामुळे ते ‘परीक्षक’ म्हणून स्पर्धकांचे कितपत योग्य परीक्षण करणार ? जे स्वतःच शिकत आहेत आणि संगीत क्षेत्रात नवीन आहेत, ते नवीन स्पर्धकांना कशी दिशा देणार ?’ त्यामुळे ‘त्यांना परीक्षक नेमणे’, मला सयुक्तिक वाटले नाही.

३. नवोदित स्पर्धकांना गायनाच्या दृष्टीने योग्य दिशा न मिळाल्यास नवोदित स्पर्धकांची हानी होणे

स्पर्धांचा उद्देश ‘स्पर्धकांना संगीत कलेची योग्य दिशा देणे’, हा असेल, तर अशाने नवोदित स्पर्धकांना खरेच योग्य दिशा मिळेल का ? माझ्या मनात ‘स्पर्धा आयोजित करणार्‍या आयोजकांची दिशा चुकत आहे का ?’, असा प्रश्न आला. खरेतर अशा स्पर्धेमध्ये ‘नवोदित स्पर्धक परीक्षकांकडून योग्य दिशा मिळेल’, या अपेक्षेने येतो आणि ‘परीक्षक योग्य न्याय देतील’, असा त्यांचा विश्वास असतो’; परंतु ‘असे परीक्षक स्पर्धेत नेमून आयोजक एकप्रकारे नवोदित स्पर्धकांची हानीच करत आहेत’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘स्पर्धकाला परीक्षकांकडून योग्य दिशा मिळणे, हे आयोजकांचे मोठे दायित्व असते’, याची जाणीव ठेवून योग्य जाणकार परीक्षक नेमून स्पर्धकांना कार्यक्रमामधून योग्य दिशा दिल्यास त्यांच्या कलेचे भविष्य चांगले घडेल.

कला ही देवाची अनमोल देणगी आहे अन् ‘स्पर्धेमध्ये येणार्‍या प्रत्येक स्पर्धकाच्या कलेला योग्य न्याय मिळणे’, हे आयोजकांचे दायित्व आहे. स्पर्धकांचे भवितव्य कार्यक्रमातील परीक्षकांच्या दिशादर्शनावर अवलंबून आहे. त्यामुळे आयोजकांनो, कार्यक्रमासाठी योग्य आणि जाणकार परीक्षक नेमून आपल्या कार्यक्रमांमधून नवोदित कलाकारांना कलेत पुढे जाण्याच्या दृष्टीने योग्य दिशा द्या.’

– सौ. भक्ती कुलकर्णी, संगीत अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.६.२०२१)