अमेरिकेसारख्या रज-तम प्रधान देशातही साधना करत असल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे !

(सुश्री (कु.)) सुप्रिया गजेंद्र टोणपे या नोकरीनिमित्त ७ वर्षे अमेरिकेत वास्तव्याला होत्या. तेथील रज-तम प्रधान वातावरणातही त्यांनी हिंदु धर्माचे संस्कार जपले. त्या कोणत्याही प्रलोभनाला न भुलता त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू ठेवली. केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेमुळेच त्या हे करू शकल्या. आता त्या चांगल्या वेतनाची नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्यासाठी भारतात परत आल्या आहेत. भाद्रपद शुक्ल षष्ठी (२.९.२०२२) या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त अमेरिकेत असतांना साधना करत असतांना त्यांना आलेल्या अनुभूती, जाणवलेली सूत्रे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी टप्याटप्प्याने पूर्णवेळ साधना करण्यासाठी करून घेतलेली त्यांच्या मनाची सिद्धता इत्यादी सूत्रे येथे दिली आहेत.

सुश्री (कु.) सुप्रिया टोणपे यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

(सुश्री (कु.)) सुप्रिया गजेंद्र टोणपे

१. अमेरिकेत असतांना आलेल्या अनुभूती

१ अ. भारतातून अमेरिकेला परत जातांना सनातनची सात्त्विक उत्पादने आणि आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे साहित्य घेऊन जाणे आणि एक-दीड वर्षांनी भारतात परत येईपर्यंत ती कधीही न्यून न पडणे : ‘मी अमेरिकेत नोकरीसाठी वास्तव्याला असतांना एक ते दीड वर्षांनी ३ आठवड्यांच्या सुटीसाठी भारतात येत असे. मी भारतातून अमेरिकेत परत जातांना एक ‘बॅग’ भरून सनातनची सात्त्विक उत्पादने आणि आध्यात्मिक उपायांचे साहित्य घेऊन जात असे. मी प्रतिदिन हे साहित्य वापरत असून आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना भेट देऊनही मी पुन्हा भारतात परत येईपर्यंत मला ते साहित्य कधीही न्यून पडले नाही.

१ आ. अमेरिकेतील घरे लाकडाची असल्यामुळे घरात थोडा धूर झाला, तरी तिथे ‘फायर अलार्म’ (आग लागल्याची घंटा) वाजणे, घरात भाजी किंवा वरण याला फोडणी दिल्यावर होणार्‍या धुरानेही ‘फायर अलार्म’ वाजणे; परंतु सनातनची उदबत्ती लावल्यावर तो न वाजणे : अमेरिकेतील घरे लाकडापासून बनवलेली असतात. त्यामुळे घरात धूर झाला किंवा थोडासा जाळ झाला, तरी तेथील ‘फायर अलार्म’ वाजतो आणि त्याकडे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अन् अग्नीशमन दलाचे लक्ष असते. भाजी किंवा वरण यांना फोडणी दिल्यानंतर जो थोडा धूर होतो, त्यामुळेही ‘फायर अलार्म’ वाजत असे; पण मी प्रतिदिन देवाची पूजा करतांना किंवा घराची शुद्धी करण्यासाठी सनातनची उदबत्ती लावल्यावर कधीही ‘फायर अलार्म’ वाजला नाही. याचे मला आणि माझ्या मैत्रिणींना आश्चर्य वाटत असे.

१ इ. पू. (सौ.) भावना शिंदे यांनी ‘कुंकू हे संरक्षककवच आहे’, असे सांगून ते लावण्याचे महत्त्व सांगितल्यापासून प्रतिदिन कपाळावर कुंकू लावूनच कार्यालयात जाणे : मी कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेसाठी गेले होते. तेव्हा मला कुंकू सापडत नव्हते. पू. (सौ.) भावना शिंदे यांनी मला सांगितले, ‘‘कुंकू हे आपले संरक्षककवच आहे.’’ त्यांनी मला कुंकू लावण्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यामुळे मी प्रतिदिन कार्यालयात जातांना विदेशी पोशाखावरही कपाळावर छोटेसे कुंकू लावून जाऊ लागले. माझे कुंकू पाहिल्यानंतर समोरची व्यक्ती आपोआपच माझ्याशी आदराने बोलत असे. त्यामुळे अमेरिकेतील रज-तम प्रधान वातावरणात ‘कुंकू हे माझे संरक्षककवच आहे’, असे मलाही वाटू लागले.

१ ई. लहानपणापासून सोमवारचे उपवास करणे आणि अमेरिकेत उपवासाचे पदार्थ मिळण्याची शक्यता नसूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने उपवासात खंड न पडणे : लहानपणापासून मला शिव (शंकर) ही देवता विशेष आवडते. साधनेत येण्यापूर्वी मी लहानपणापासून ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप आणि सोमवारचा उपवासही करत असे. मी अमेरिकेत गेल्यानंतर ‘तिथे उपवासाचे पदार्थ मिळणे शक्य नसल्याने सोमवारचा उपवास मी करू नये’, असे माझ्या कुटुंबियांना वाटले; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मी अमेरिकेत असतांनाही सोमवारचे उपवास करू शकले.

१ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत असून ते रक्षण करत असल्याविषयी आलेली अनुभूती

१ उ १. शनिवारी आणि रविवारी अमेरिकेतील मोठ्या घरात एकटीने रहावे लागणे, तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण समवेत आहेत’, असे जाणवून कधीही भीती न वाटणे : मी अमेरिकेतील मोठ्या घरात माझ्या मैत्रिणींच्या समवेत रहात असे. त्यांना प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी बाहेर फिरायला जाण्याची सवय होती. ते २ दिवस मी घरात एकटीच रहात असे. मी घरात एकटी असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राशी बोलत असे. घरातील कामे आणि सेवा करतांना मला ‘गुरुदेव आणि श्रीकृष्ण सतत माझ्या समवेत आहेत’, असे वाटायचे. त्यामुळे मला घरात एकटी असतांना कधीच भीती वाटली नाही किंवा कधी भीतीदायक स्वप्नेही पडली नाहीत.

१ उ २. मैत्रिणींना एकट्याने रहायला भीती वाटणे आणि त्यांना रात्री भीतीदायक स्वप्ने पडणे : माझ्या मैत्रिणींना त्या घरात एकट्या असतांना पुष्कळ भीती वाटत असे. त्यांना रात्री भयानक स्वप्ने पडायची. त्यांना ‘झोपेत कुणीतरी त्यांच्या तोंडावर उशी दाबून त्यांना जिवे मारत आहे आणि त्यांचा जीव गुदमरत आहे’ असे जाणवायचे; परंतु मला त्याच घरात राहूनही कधी भीतीदायक स्वप्ने पडली नाहीत. त्यामुळे मला परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्याप्रती फार कृतज्ञता वाटत असे.

१ ऊ. कार्यालयातील कामामध्ये अडचण येणे, ती प्रयत्न करूनही न सुटणे, प्रार्थना आणि नामजप केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अडचणीवरील उपाय लक्षात येऊन ती सुटणे : एकदा मी घरातून शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवारी पहाटेपर्यंत कार्यालयीन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. मला कसेही करून ते काम सोमवारपर्यंत पूर्ण करायचे होते; पण त्यात एकामागोमाग एक अडचणी येत होत्या आणि मी त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी काम पूर्ण होण्यापूर्वी एक नवीनच अडचण आली आणि ती काही केल्या सुटत नव्हती. माझी बुद्धी काम करेनाशी झाली. शेवटी पहाटे मी देवासमोर बसले आणि प्रार्थना करून नामजप केला. तेव्हा सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘कुठे काय पालट करायला हवा आणि नवीन काय करायला हवे ?’, ते सुचवले. मी तसे केल्यावर अडचण सुटून माझे काम पूर्ण झाले.’

– आपली चरणसेविका,

सुश्री (कु.) सुप्रिया गजेंद्र टोणपे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१२.२०२१)

(क्रमशः)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक