१. प्रगत भारतीय कृषी परंपरा
पुरातन भारतीय कृषी परंपरा ही निसर्गाला अनुकूल होती. स्थानिक परिस्थितीशी सुसंगत अशा देशी बियाण्यांचा उपयोग करणे, मातीचे स्वास्थ्य टिकवून ठेवणे आणि शेतातील जिवाणू, कीटक, तसेच पिके यांची जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) राखणे अशा भक्कम पायावर ही व्यवस्था उभी होती. हवामान, ऋतूचक्र यांच्या अभ्यासासमवेतच आकाशातील विविध ग्रह-नक्षत्रे, विशिष्ट तिथी आणि दिवसाचे ठराविक प्रहर यांमध्ये केलेल्या कृतींचा पिकांच्या वाढीवर कसा परिणाम होतो, याचेही ज्ञान भारतीय शेतकर्याला होते. उदा. पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना विविध किडींचा अंडी घालण्याचा कालावधी असतो, त्यामुळे या दिवशी पिकांवर नैसर्गिक घटकांपासून बनलेल्या किटकनाशकांची फवारणी केल्याने कीडनियंत्रण होते.
२. म्हणी आणि चालीरीती यांच्या माध्यमांतून जपलेल्या परंपरा
अशा परंपरांवर आधारलेली अनेक वचने आणि म्हणीसुद्धा प्रचलित आहेत. काही दिवसांपूर्वी सामाजिक संकेतस्थळावर ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक असलेले श्री. बसवंत विठाबाई बाबाराव यांचा लेख वाचनात आला. त्यांचा हा लेख दैनिक ‘आपलं महानगर’ यात ५.५.२०१९ या दिवशी प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांनी ‘अकितीला आळं, तर बेंदराला फळं’ अशी एक म्हण दिली आहे. यावर त्यांनी पुढील माहिती दिली आहे. ‘अकिती’ किंवा ‘आखेती’ म्हणजे ‘अक्षय्य तृतीया’. उन्हाळी पिकांची लागवड करण्यासाठी या दिवशी आळे करून शेतात बी पेरले जाते आणि त्या रोपांना आषाढ पौर्णिमेच्या आसपास साजर्या होणार्या ‘बेंदूर’ या सणापर्यंत फळधारणा होते. हा दिवस शेतीच्या कामांचा आरंभ करण्याचा मुहूर्त मानला जातो. उन्हाळ्यात लागवड होणार्या दुधी, दोडके, भोपळा, कोहळा, कारली, वाल, घेवडा अशा बियाण्यांची लागवड या दिवशी करतात. आले आणि हळद यांचीही लागवड या दिवशी केली जाते.
३. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बियाण्याची उगवण क्षमता पडताळणे
श्री. बाबाराव पुढे लिहितात, ‘अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बियाण्याची उगवण क्षमता पडताळून पहाण्याचीही एक पद्धत प्रचलित आहे. शेतात मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी करण्यापूर्वी बियाण्याच्या उगवण क्षमतेची चाचणी झाली, तर शेतकर्याला त्याचा पुष्कळ लाभ होतो. ज्या धान्याची पेरणी करायची आहे, त्याचे शंभर दाणे घेऊन एका गोणपाटावर ओळीने मांडत त्याची गुंडाळी करावी आणि ती पाण्याने भिजवून ठेवावी. ओलावा टिकून रहाण्यासाठी त्यावर प्रतिदिन थोडे पाणी शिंपडावे. बियाण्याच्या प्रकारानुसार ही गुंडाळी ३ ते ५ दिवसांनी उघडून पहावी आणि अंकुरण झालेल्या बियांची संख्या मोजावी. नव्वदहून अधिक बियाणे उगवले, तर ते पेरण्यास उत्तम असे समजावे. काही ठिकाणी हीच पडताळणी थोडेसे बी एका रांगेत भूमीवर पेरून केली जाते.’
४. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी छतावर केलेल्या लागवडीविषयी आलेले अनुभव
वरील विषय वाचनात आल्यानंतर ‘आपणही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उन्हाळी भाज्यांची लागवड करून पहावी’, असे मला वाटले. त्यानुसार भेंडी, दुधी, कोहळा आणि आले यांची लागवड या दिवशी केली. ‘अकितीला आळं, तर बेंदराला फळं’ या म्हणीनुसार खरोखरच आषाढ पौर्णिमेच्या सुमारास भेंडी, दुधी आणि कोहळा तयार झाले होते. (छायाचित्रे पहा.)
५. परंपरांचे जतन आणि अभ्यास करण्याची आवश्यकता
इंग्रजांच्या राजवटीच्या वेळी चालू झालेल्या मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने भारतियांना मनाने गुलाम बनवून टाकले. ‘त्याचाच परिणाम म्हणून कृषी विद्यापिठांनी इतकी वर्षे या सर्व कृषीपरंपरा कशा नामशेष होतील, यासाठीच प्रयत्न केले कि काय ?’, अशी शंका येते. आज सुजलां-सुफलाम् भारतभूमीची दुर्दशा झाली आहे. वरकरणी रासायनिक शेतीतून दिसणार्या उत्पादन वाढीला शेतकरी भुलला; पण कालांतराने ‘भूमी नापिक होत आहे’, हे कळल्यावर तिला वाचवण्याचा उपाय मात्र रासायनिक तंत्रज्ञानाकडे नव्हता ! या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी निसर्गानुकूल आणि शाश्वत शेतीतंत्राचा प्रसार होणे, याविषयी शेतकर्यांमध्ये आणि जनसामान्यांमध्येही जागृती करणे, पूर्वीच्या शेती परंपरांवर संशोधन होणे, तसेच त्यांच्या नोंदी ठेवून अभ्यास करणे आवश्यक आहे.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा.(३०.८.२०२२)
संपादकीय भूमिकाहिंदुत्वनिष्ठांनो, भारताचे हिंदुकरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये प्राचीन कृषी परंपरेचे पुनरुज्जीवन करणेही नितांत आवश्यक आहे, हे जाणा ! |