आज १ सप्टेंबर २०२२ या दिवशी ‘ऋषिपंचमी’ आहे. त्या निमित्ताने…
‘भाद्रपद शुक्ल ५, हा दिवस ‘ऋषिपंचमी’ म्हणून प्रसिद्ध आहे. विशेषतः स्त्रिया या दिवशी ऋषींचे पूजन करतात. या पूजेच्या संबंधी ‘भविष्योत्तर पुराणा’त २ कथा आहेत. स्त्रीने स्वतःच्या पावित्र्यासाठी ऋषिपंचमीस ऋषीपूजन करावे, म्हणजे ‘रजस्वला (मासिक पाळीच्या कालावधीत) असतांना तिच्या हातून काही पातक घडल्यास दोषपरिमार्जन होते’, असा संकेत आहे. बंगाल प्रांतातही अशीच समजूत आहे. तिकडे आषाढ मासात ३ दिवस पृथ्वी रजस्वला समजतात. या काळात भूमीमध्ये कोणी पेरणी करत नाही की खणतही नाहीत. या दिवसाचे खरे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.
ऋषींनी केलेले कार्य आणि त्यांची महानता
अनुमाने ७-८ सहस्र वर्षांपूर्वी भारताच्या वायव्येस रहाणारे आर्य लोक पंजाबमध्ये आले. त्यांनी आपणांस साहाय्य करणार्या इंद्र, रुद्र, विष्णु इत्यादि प्रसिद्ध शक्तींना देव मानून त्यांचे गुणगान चालू केले. ‘‘वेदातील सूक्ते ज्या महापुरुषांनी रचली आणि गायली, त्यांस ‘ऋषि’ ही बहुमानार्थी संज्ञा देण्यात आली.’’ ऋषींनी वेदरक्षण करून त्यातील धर्माचा प्रसार केला. त्याच ऋषींचे आपण अनुयायी आहोत. संध्यावंदनाचे वेळी स्वतःच्या गोत्राचा उच्चार करून ‘आपला संबंध प्राचीन ऋषींशी आहे’, याची स्मृती आपण ताजी ठेवत असतो. या प्राचीन ऋषींपैकी जे महर्षि विशेष प्रसिद्धीस आले, त्यांची नावे चिरस्मरणीय व्हावीत, म्हणून उत्तरेकडील ध्रुवाभोवती ते प्रदक्षिणा घालत आहेत. अशा नक्षत्रपुंजांतील ७ नक्षत्रांना ऋषींची आणि एका नक्षत्राला एका ऋषिपत्नीचे नावे देण्यात आले आहे. त्यांना ‘सप्तर्षी’ असे म्हणतात. त्यांची नावे कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि, वसिष्ठ आणि अत्रि अशी असून, त्यापैकी वसिष्ठ ऋषींच्या पत्नीचे नाव अरुंधती असे आहे. या ऋषींचे पुण्यप्रद पूजन या दिवशी करावयाचे असते.
(साभार : ‘दिनविशेष’ )