गोरक्षण केल्यास गोरक्षकांवरच खोटे गुन्हे नोंद करण्याची धमकी
पुणे – इंदापूर येथील पशूवधगृहात ६० ते ७० जनावरे कत्तलीसाठी जमा केल्याची माहिती येथील अक्षय कांचन यांना मिळाल्यावर त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात माहिती दिली आणि कारवाई करण्याविषयी सांगितले; परंतु त्या माहितीकडे संबंधित पोलीस अधिकारी तय्यब मुजावर यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे ही माहिती त्यांनी संबंधित पोलीस उपअधीक्षक इंगळे यांना सांगितली. त्यानंतर घाईने मुजावर यांनी तक्रार लिहून घेतली; मात्र तक्रारीमध्ये ४० जनावरांचा उल्लेख असतांनाही केवळ ९ जनावरे गुन्ह्यात दाखवली. त्यानंतर तोही आकडा पालटला आणि ती निरा नृसिंह गोशाळा येथे पाठवली. इतर जनावरे ही पोलिसांच्या साहाय्याने परस्पर कसायांच्या कह्यात दिली आणि गोरक्षण केल्यास त्यांना अन् त्यांच्या सहकार्यांना खोटे गुन्हे नोंद करण्याची धमकी दिली. याची चौकशी होऊन योग्य ती कारवाई करण्याचे निवेदन अक्षय यांनी पुणे पोलिसांना दिले असून याची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांनाही देण्यात आली आहे.
निवेदनात अक्षय कांचन यांनी म्हटले आहे की, इंदापूर येथील समीर कुरेशी हा या धंद्यातील व्यापारी असून त्याच्या सोबत मुजावर यांची या धंद्यात भागीदारी आहे. कुरेशी आस्थापनाकडून त्यांना पोलीस ठाणे चालवण्यासाठी प्रतिमास पैसे मिळतात. इंदापूर येथील काष्टीचा बाजार, अकलुजचा बाजार, सातारा येथील सदर बाजार, बारामती येथील गुरांचा बाजार येथून देशी गायी, कालवडे खरेदी करून इंदापुरच्या पशूवधगृहात अवैधपणे आणली जातात, तसेच अवैधरित्या पशूवधगृहात या जनावरांची कत्तल होते. या गोमांसाचे अवैधरित्या कोंढवा, सय्यदनगर, रामटेकडी, वैदवाडी, येरवडा, कॅम्प, महंमदवाडी आदी ठिकाणी वितरण केले जाते. ही माहितीही आम्ही मुजावर यांना दिली आहे. एखादा पोलीस खात्यातील अधिकारी जर अशा पद्धतीचे गुन्हेगारी कृत्य करीत असेल आणि गुन्हेगारांना साहाय्य करत असेल तर ही बाब अत्यंत दुर्देवी आणि खेदाची आहे.