आसाममध्ये अल् कायदाच्या २ संशयित आतंकवाद्यांना अटक

अकबर अली आणि अबुल कलाम आझाद

गौहत्ती (आसाम) – आसामच्या बारपेटा जिल्ह्यात आणखी २ आतंकवाद्यांना नुकतीच अटक करण्यात आली. या आतंकवाद्यांचा ‘अल् कायदा’ या आतंकवादी संघटनेशी संबंध आहे, अशी माहिती बारपेटाचे पोलीस अधीक्षक अमिताव सिन्हा यांनी दिली. बारपेटा येथे अवैधपणे बांधण्यात आलेल्या एका मदरसाशी या आतंकवाद्यांचा संबंध आहे. या आतंकवाद्यांची ओळख पटली असून एकाचे नाव अकबर अली आणि दुसर्‍याचे नाव अबुल कलाम आझाद असे आहे, असे पोलिसांनी सांगितले.

१० दिवसांत ६ आतंकवाद्यांना अटक

आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याच्या प्रकरणात आसाम पोलिसांनी मागील १० दिवसांत ६ जणांना अटक केली आहे. यापूर्वी गोलपारा जिल्ह्यातून ४ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती. २ दिवसांपूर्वी आसाम पोलिसांनी गोलपारा जिल्ह्यात हाफिजूर रहमान मुफ्ती नावाच्या मदरशाच्या मौलवीला (इस्लामच्या धार्मिक नेत्याला) अटक केली होती. काही दिवसांपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी गावात अनोळखी इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख) आल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले होते.

संपादकीय भूमिका

आसाममध्ये मागील काही दिवसांत आतंकवाद्यांना अटक होत आहे. सीमेवरील राज्यात अशा प्रकारे आतंकवादी सापडणे, हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक !