‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली अर्धनग्न आणि अश्‍लील छायाचित्रे प्रसारित करणार्‍या अभिनेत्रींविरुद्ध कारवाई करा !  

हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’ची मागणी

(‘बेबी बंप फ्लाँटिंग’ म्हणजे स्वत: गरोदर असल्याची प्रसंगी अश्‍लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्याची टूम !)

हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या सौ. संदीप मुंजाल

चंडीगड – सध्या भारतात ‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली हिंदी चित्रपटसृष्टमध्ये गरोदर असलेल्या अनेक अभिनेत्री त्यांची अर्धनग्न आणि अश्‍लील छायाचित्रे प्रसारमाध्यमांत प्रसारित करत आहेत. ही कृत्ये समाजातील सर्वसामान्य स्त्रियांमध्ये लज्जा निर्माण होईल, अशी आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मा, करीना कपूरपासून ते बिपाशा बासूपर्यंत या अभिनेत्री गरोदरपणात वाढलेले पोट उघडे करून अंगप्रदर्शन करत आहेत. भारतीय दंडसंहितेतील कलम २९२ आणि २९३ नुसार ‘अश्‍लीलतेचा प्रसार’ हा शिक्षापात्र गुन्हा आहे. दंडसंहितेतील कलम २९४ नुसार ‘सार्वजनिक ठिकाणी अश्‍लील कृती करणे’ दंडास पात्र गुन्हा आहे. त्यामुळे या अभिनेत्रींवर, तसेच त्यांची छायाचित्रे प्रसारित करणार्‍या माध्यमांवर गुन्हे नोंदवण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या सौ. संदीप मुंजाल यांनी केली आहे.

‘रणरागिणी’च्या वतीने सौ. संदीप मुंजाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा सुश्री. रेखा शर्मा, तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की,

१. ‘बेबी बंप फ्लाँँटिंग’ असे नामकरण करत गरोदरपणात वाढलेले पोट उघडे ठेवून जगाला दाखवण्याची, त्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरून छायाचित्रे काढून अंगप्रदर्शन करण्याची जोरदार चुरस या अभिनेत्रींमध्ये चालू आहे. ही कृत्ये सर्वसामान्य कुटुंबातील गरोदर स्त्रीच्या मनात लज्जा निर्माण करणारी आणि समाजात सहजपणे वावरण्यास अडचणीचे ठरणारी आहे.

२. वास्तविक गर्भारपण हा स्त्रीच्या जीवनातील मातृत्वाच्या प्रवासाचा, अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत व्यक्तिगत असा काळ असतो; मात्र चित्रपट अभिनेत्रींनी स्वत:च्या गरोदरपणाचे केवळ व्यावसायिक लाभासाठी, प्रसिद्धीसाठी करत असलेले ओंगळवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीसाठी लज्जास्पद आहे. हे व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली केले जात असले, तरी समाजहिताला बाधा पोचवणारे आहे, याला अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणू शकत नाही.